जिल्ह्यात दोन हजार नागरिकांना विंचूचा चावा
By निखिल म्हात्रे | Published: February 4, 2024 06:01 PM2024-02-04T18:01:26+5:302024-02-04T18:02:20+5:30
रायगड जिल्ह्यात सर्प दंश तसेच विंचूदंशाचे प्रमाण वाढले आहे.
अलिबाग - रायगड जिल्ह्यात सर्प दंश तसेच विंचूदंशाचे प्रमाण वाढले आहे. मागील 14 महिन्यात जिल्ह्यात 393 जणांना सर्प तर सुमारे दोन हजार जणांना विंचूदंश झाला असून, यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अथक प्रयत्न करुन सर्प व विंचू दंश झालेल्या अनेक रुग्णांचे प्राण वाचविले असल्याचे आकडेवारीवर नजर टाकल्यास स्पष्ट होते. सध्याच्या मौसमात साप व विंचू बाहेर पडण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे या काळावधीत सर्प व विंचू दंशाचे प्रमाण वाढते. डिसेंबर 2023 ते फेब्रुवारी 2024 महिन्यात जिल्ह्यात 393 जणांना सर्प तर सुमारे दोन हजार जणांना विंचूदंश झाला आहे. यामध्ये सर्पदंशाने पाच जणांना तर विंचू एकाला प्राण गमवावे लागले आहेत. सर्प व विंचूदंशाचे सर्वाधिक प्रमाण अलिबाग तालुक्यात आहे. पनवेल, खालापूर, महाड, माणगाव या तालुक्यांमध्येही सर्प व विंचूदंशाचे प्रमाण जास्त आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात सर्पदंशावरील अॅन्टी स्नेक व्हॅक्सीन, तर अॅन्टी स्कोर्पियन व्हॅक्सीन मुबलक प्रमाणात ठेवण्यात आली आहेत. जिल्हा रुग्णालयात या औषधांचा साठा अधिक आहे. रुग्णालयांना औषधांची अतिरिक्त गरज भासली तर तत्काळ उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. अंबादास देवमाने यांनी दिली.
सर्प वा विंचू दंश झाल्यावर तत्काळ सरकारी रुग्णालयात रुग्णास आणल्यास त्यावर त्वरीत योग्य ते उपचार होत असल्याने या दोन्हीतील मृत्यूंचे प्रमाण अत्यल्प असल्याचे मागील 14 महिन्यातील आकडेवारीवरुन स्पष्ट होते. परंतु आजही ग्रामीण भागात सर्प वा विंचू दंश झाल्यावर त्याचे विष उतरवण्याकरीता मांत्रिक वा भगताकडे रुग्णास नेले जाते. व नंतर रुग्णालयात आणले जाते. यामुळे काही वेळेस रुग्णाचा मृत्यू होतो. सर्प दंश वा विंचू दंश झाल्यास जवळच्या सरकारी दवाखान्यात रुग्णास दाखल करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य यंत्रणेने केले आहे.
सर्पदंश आणि विंचूदंशचे प्रमाण मोठे असले तरी त्यामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण अत्यल्प आहे. अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालय, माणगांव, पेण, कजर्त, रोहा व श्रीवर्धन अशी पाच उप जिल्हा रुग्णालये तर उरण, महाड, जसवली, मुरुड, पोलादपूर, पनवेल, चौक आणि कशेळे ही आठ ग्रामीण रुग्णालये अशा जिल्ह्यातील 14 ठिकाणी सर्पदंश आणि विंचूदंशावर तत्काळ उपचार उपलब्ध होत असल्याने सर्पदंश आणि विंचूदंशाच्या मृत्यूंच्या प्रमाणात घट झाली आहे.
सापांचा वावर रात्री जास्त असतो, त्यामुळे अंधारात चालताना बॅटरी सोबत असावी, साप आपल्या समोर आल्यास न घाबरता स्तब्ध उभे राहावे, सापाचे लक्ष विचलित करण्यासाठी जवळची एखादी वस्तू बाजूला फेकल्यास त्या वस्तूकडे सापाचे लक्ष जाताच तुम्ही बाजूला व्हावे. तसेच साप चावल्यास मांत्रिक व भगताकडे न जाता रुग्णालयात जाऊन उपचार करावेत. - संदिप ठाकूर, प्राणीमित्र.