मदतकार्य करताना एनडीआरएफच्या जवानाच्या पायाची दोन बोटे तुटली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 05:19 AM2020-06-07T05:19:52+5:302020-06-07T05:20:06+5:30
श्रीवर्धन येथे मदतकार्य करताना झाला अपघात । श्रीवर्धन-मुंबई असा उभारला ग्रीन कॉरिडॉर
आविष्कार देसाई ।
अलिबाग : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्याच्या बहुतांश भागांमध्ये हाहाकार उडवत प्रचंड नुकसान केले आहे. श्रीवर्धन तालुक्यामध्ये आपत्तीनंतरच्या कामांना गती देण्यात आली आहे. शनिवारी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे इंद्रजीत सिंह चव्हाण हे काम करताना जखमी झाले आहेत. त्यांच्या उजव्या पायाची दोन बोटे तुटली आहेत. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
जिल्ह्यातील आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या चार तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये त्यांनी आपत्तीपश्चात मदतकार्याला वेगाने सुरुवात केली आहे.
शनिवारी सकाळी आपत्ती दलामार्फत श्रीवर्धन तालुक्यात मदतकार्य सुरू होते. यातील जवान इंद्रजीत सिंह चव्हाण हे मदतकार्य करत असताना त्यांना अपघात झाला. त्यामध्ये त्यांच्या उजव्या पायाची दोन बोटे तुटून पडली. त्यांना तातडीने श्रीवर्धनच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तातडीने मुंबई येथील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु श्रीवर्धन ते मुंबई हे अंतर तब्बल १८८ किमीचे होते. त्यासाठी किमान सहा तास लागणार होते. जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी तातडीने ग्रीन कॉरिडॉर तयार करण्याच्या सूचना केल्या. यासाठी रायगड पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर तयार केला. चव्हाण यांच्या रुग्णवाहिकेसोबत एक पोलीस वाहन पायलेटिंगकरिता दिले. रुग्णालयापर्यंत वेळेत पोहोचणे त्यांना शक्य झाले, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक विनोद वाघ यांनी दिली.
नागोठणे ते मुंबई-ब्रीच कॅण्डी रुग्णालय
श्रीवर्धन येथून चव्हाण यांना नागोठणेपर्यंत आणले. त्यानंतर नागोठणे ते मुंबई-ब्रीच कॅण्डी रुग्णालय असा ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. त्यामुळे १०० किमीचे अंतर फक्त सव्वा तासात पार करणे शक्य झाले. एरवी हेच अंतर पार करण्यासाठी किमान तीन ते सव्वातीन तासांचा अवधी लागतो.