अलिबाग समुद्रात दोन पर्यटक बुडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 05:03 AM2017-08-16T05:03:03+5:302017-08-16T05:03:06+5:30
भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने सौरभ खान (२३) आणि ऋषभ सिव्हा (२४) हे दोघे पर्यटक समुद्रात बुडून बेपत्ता झाले.
रायगड : भरती सुरू झालेली असताना, अलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ला पाहून किना-याकडे परत येताना, भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने सौरभ खान (२३) आणि ऋषभ सिव्हा (२४) हे दोघे पर्यटक समुद्रात बुडून बेपत्ता झाले. मंगळवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली असल्याची माहिती अलिबागचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली.
अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी तत्काळ समुद्रकिनारी पोहोचून, बुडालेल्या पयर्टकांच्या शोधाकरिता अलिबाग कोळी बांधवांच्या सहकार्याने बोटी उपलब्ध करून दिल्या; परंतु या शोधकार्यास यश आले नाही. भरतीच्या प्रवाहाबरोबर हे दोघेही रेवदंडा समुद्रकिनाºयाकडे वाहत गेले असावेत, असा अंदाज जाणकार कोळीबांधवांनी व्यक्त केला आहे. अलिबाग उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रेय निघोट, अलिबाग तहसीलदार प्रकाश संकपाळ यांनी समुद्रकिनारी पोहोचून शोधकार्याकरिता नियोजन केले.
रसायनीमधील डेकोर होम कंपनीमध्ये सिव्हिल इंजिनीअर म्हणून कार्यरत असलेले एकूण पाच मित्र अलिबाग समुद्रकिनारी मंगळवारी पर्यटनार्थ आले होते. त्यापैकी तिघांनी अलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ला पाहण्यास जाण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी समुद्रास पूर्णपणे ओहोटी होती. परत येताना भरतीचे पाणी भरू लागले. त्यांनी त्याच भरतीच्या पाण्यातून किनाºयाकडे येण्यास प्रारंभ केला.
मात्र भरतीच्या पाण्याच्या प्रवाहाच्या वेगाचा अंदाज न आल्याने सौरभ खान आणि ऋ षभ सिव्हा हे दोघे प्रवाहात वाहत जाऊन समुद्रात बेपत्ता झाले. त्यांचा तिसरा सहकारी मित्र सुरेश स्वामी (सध्या रा. रसायनी, मूळ-अक्कलकोट) हा सुदैवाने पोहत समुद्रकिनारी पोहोचला. त्याने आपल्या अन्य दोघा मित्रांचा किनाºयावर प्रथम शोध घेतला. त्यानंतर त्यांनी अलिबाग पोलिसांशी संपर्क साधल्यावर, तत्काळ ही शोधमोहीम सुरू करण्यात आली.
>स्थानिकांच्या सूचनेकडे पर्यटकांचे दुर्लक्ष
अलिबागच्या समुद्रात दोघे पर्यटक बुडाले असताना, त्यांना शोधण्याकरिता शोधमोहीम सुरू असताना, याच किनाºयावरील भरतीच्या पाण्यात किमान २०० पर्यटक पाण्यात पोहत आणि डुंबत होते. सुरक्षेच्या कारणास्तव पाण्यात जाऊ नका, असे स्थानिक नागरिकांनी यापैकी काही जणांना सांगितले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून पर्यटक समुद्रात डुंबतच होते.