लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : तालुक्यात पाथरज या महसुली गावात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत असून, तेथील डोंगरपाडा गावाच्या शिवारात एकाच भागात दोन वळण बंधारे बांधले गेले आहेत. बंधाऱ्यांच्या खालील भागात फार मोठे जमीन क्षेत्र नाही. त्यामुळे कृषी विभागाचे जलयुक्त शिवार अभियान ठेकेदारासाठी की शेतकऱ्यांसाठी राबवित आहे, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. या दोन्ही वळण बंधाऱ्यांवर कृषी विभागाने दहा लाख रुपये खर्च केले आहेत. त्याच वेळी त्या वळण बंधाऱ्याचे काम करताना सिमेंट बांधकाम होत असताना पाण्याचा वापर फार कमी प्रमाणात केला आहे. त्यामुळे पावसाळ्यात तेथील सिमेंट वळण बंधारे नादुरुस्त होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.पाथरज या महसुली गावाच्या परिसरात डोंगरपाडा गाव असून, तेथे जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानामधून डोंगरपाडा येथील आश्रमशाळेच्या मागे दोन वळण बंधारे कृषी विभागाने बांधले आहेत. त्या ठिकाणी वरच्या भागात मोठ्या प्रमाणात भाताचे शेत आहे, तर सिमेंट वळण बंधारे बांधण्यात आलेल्या ठिकाणी फार कमी प्रमाणात शेतजमीन आहे. अशा वेळी वळण बंधाऱ्यांचा उपयोग किती प्रमाणात होईल, हा प्रश्न आहे. जलसंधारण नियमानुसार पाच लाख रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या वळण बंधाऱ्याच्या पाण्याचा फायदा किमान पाच हेक्टर जमिनीला झाला पाहिजे. मात्र, त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात भाताची शेती नाही. त्यामुळे दोन वळण बंधारे बांधण्याचा उद्देश काय? असा प्रश्न डोंगरपाडा गावातील शेतकरी उपस्थित करीत आहेत. कृषी विभागाच्या खोपोली येथील कृषी अधिकाऱ्यांनी कामे मंजूर केली, त्या वेळी त्यांनी वळण बंधाऱ्यांच्या खाली असलेल्या जमीन क्षेत्राची माहिती देताना ती खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न होत आहे. त्यामुळे कृषी विभागाने दहा लाख रुपयांचा केलेला खर्च हा ठेकेदाराला खूश करण्यासाठी केला असल्याचा आरोप होत आहे. वळण बंधाऱ्यांच्या खालील भागात मोठ्या प्रमाणात माळरान आणि लहान वृक्ष असलेली झाडी आहे. अशा वेळी त्या ठिकाणी १० लाख खर्चून किमान १० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल का? याची खात्री कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करण्याची गरज आहे. त्याच वेळी त्या वळण बंधाऱ्याचे काम करताना सिमेंट बांधकाम होत असताना पाण्याचा वापर फार कमी प्रमाणात केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पावसाळ्यात तेथील सिमेंट वळण बंधारे नादुरुस्त होण्याची शक्यता आहे.कृषी विभागाने तांत्रिक मान्यता घेऊन या दोन्ही वळण बंधाऱ्यांची कामे मंजूर केली आहेत. त्याच वेळी कामे होत असताना कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी १२ तास उभे राहू शकत नाहीत. मात्र, त्या सर्व कामांच्या देखभाल आणि दुरु स्तीसाठी काही निधी सुरक्षा अनामत म्हणून राखून ठेवला आहे. त्यामुळे तूटफूट झाल्यास ती कामे पुन्हा करून घेता येतील. - महादेव काळापाड, कृषी पर्यवेक्षक
भातशेती नसलेल्या भागात दोन वळण बंधारे
By admin | Published: July 16, 2017 2:52 AM