महाड : भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर त्याची दोन मुले गंभीर जखमी झाली. शुकवारी दुपारी ३.३०च्या सुमारास महामार्गावर इसाने कांबळे गावाजवळ हा अपघात झाला.
अर्जुन हरी रासकर (५०, रा. नवेनगर, महाड ) हे सुट्टी संपवून ज्योती (१९) आणि श्रीधर (८) या दोन मुलांसह इंदापूर (पुणे) येथून एम एच ०६ व्ही वाय १३४८ या क्रमांकाच्या दुचाकीने महाडला येत होते. त्यांची पत्नी मागेच असलेल्या एस.टी. बसमध्ये होती. इसाने कांबळे गावाच्या हद्दीत त्यांच्या दुचाकीला टेम्पोने जोरदार धडक दिली. त्यात अर्जुन रासकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन्ही मुले गंभीर जखमी झाली असून त्यांना उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे. अपघाताची नोंद महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
अपघातानंतर दोन्ही मुले रस्त्यावर तडफडत होती; पण महामार्गावरून धावणारे एकही वाहन थांबले नाही. सुदैवाने पोलादपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता बागूल हे महाडकडे येत असताना त्यांना जखमी मुले दिसली. त्यांनी आपल्या वाहन चालकाच्या मदतीने तिघांनाही आपल्या गाडीतून महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर मौजे कोशिंबळे हद्दीत शिवशाही व हुंडाई कारमध्ये अपघात होऊन पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी मध्यरात्री १.३० च्या सुमारास ही घटना घडली. माणगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.