करंजा धक्क्यावर पार्क केलेल्या दुचाकी फेकल्या समुद्रात; समाजकंटकांचा बंदोबस्त करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 11:05 PM2020-10-31T23:05:35+5:302020-10-31T23:05:59+5:30
Uran : रेवस समुद्रमार्गे दररोज तरीने प्रवास करून उरण येथे येणारे प्रवासी, कामगारांची संख्या मोठी आहे. यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
उरण : करंजा येथील बंदरात कामानिमित्ताने येणाऱ्या प्रवासी, कामगारांच्या पार्क करून ठेवण्यात येणाऱ्या दुचाकी काही समाजकंटकांकडून थेट समुद्रात टाकून देण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा समाजकंटकांचा बंदोबस्त करण्याची मागणी उरण पोलिसांकडे करण्यात आली आहे.
रेवस समुद्रमार्गे दररोज तरीने प्रवास करून उरण येथे येणारे प्रवासी, कामगारांची संख्या मोठी आहे. यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. उरण येथून अलिबाग येथे जाणारे आणि अलिबाग परिसरातून उरण येथे कामानिमित्ताने येणारे प्रवासी, कामगार वेळ, पैसे वाचविण्यासाठी दुचाकी घेऊन येत असतात. याआधी बंदरावर पार्क करून ठेवण्यात येणाऱ्या दुचाकींतून पेट्रोलची चोरी करणे, नासधूस करणे आदी प्रकार सातत्याने घडत होते. परंतु आता येथे पार्क करून ठेवलेल्या दुचाकी काही समाजकंटकांकडून थेट बंदरातील समुद्रात टाकून देण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. तीन दिवसांपूर्वी उरण पंचायत समितीचे कर्मचारी तेजस म्हात्रे यांची गाडी समुद्रात टाकण्यात आली होती. समुद्राच्या ओहोटीमुळे दुचाकी प्रवाशांच्या नजरेस पडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. अशा कृत्यांमुळे प्रवासी, कामगारांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याशिवाय मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या आर्थिक नुकसानीलाही सामोरे जावे लागत आहे.