हातचलाखीने दोन महिलांचे दागिने लंपास
By admin | Published: May 26, 2017 12:18 AM2017-05-26T00:18:12+5:302017-05-26T00:18:12+5:30
महिलांशी गोडगोड बोलत, त्या महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने भरदिवसा लंपास करणारी टोळीच सध्या रायगड जिल्ह्यात सक्रिय झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : महिलांशी गोडगोड बोलत, त्या महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने भरदिवसा लंपास करणारी टोळीच सध्या रायगड जिल्ह्यात सक्रिय झाली आहे. गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून अशा प्रकारच्या गुन्ह्यांत वाढ होत आहे. मात्र, सातत्याने चोरटे फरार होण्यात यशस्वी होत आहेत. अशाच प्रकारे बुधवारी माणगाव आणि पालीमध्ये दिवसाढवळ््या अशा घटना घडल्या आहेत.
बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पाली-सुधागड तालुक्यातील झाप या गावी एक महिला खेळण्यांच्या दुकानात असताना, एक अनोळखी माणूस तेथे आला. त्याने एक बाहुली व एक गाडी खरेदी केली. त्यानंतर दुकानदार महिलेचा विश्वास संपादन करून, ‘माझ्या नवीन सोन्याच्या दुकानाचे उद्घाटन करायचे असल्याने आणि ते सुस्थितीत चालण्यासाठी हा फुलांचा हार सुहासिनीच्या हातून पालीच्या श्री बल्लाळेश्वर गणपतीला दान करा’ अशी बतावणी केली. त्याच दरम्यान दुकानदार महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हातचलाखीने काढून, १ लाख २५ हजार रुपये किमतीच्या मंगळसुत्रासह फरार झाला. दुकानदार महिलेच्या माहितीनुसार पाली पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बुधवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास माणगाव तालुक्यातील तळाशेत येथे एक महिला त्यांच्या दुकानात काम करीत असताना, एक अनोळखी व्यक्ती दुकानात आला. त्याने त्याच्या हातातील पिशवी दुकानदार महिलेस देऊन, ‘मला गुप्तदान करायचे आहे, ही पिशवी घ्या. मी गेल्यावर गणपती मंदिरात ते तुम्ही दान करा.’ असे दुकानदार महिलेस बोलण्यात गुंतवून ठेवून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि हातातील सोन्याची अंगठी, असा एकूण १ लाख २ हजार रुपये किमतीचा ऐवज हातचलाखीने काढून घेऊन चोरटा फरार झाला आहे. या प्रकरणीदेखील दुकानदार महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार माणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहवा एस. पी. पाटील हे करीत आहेत.