दोन तरुणांनी विझवला सरसगडावरील वणवा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 02:06 AM2020-04-29T02:06:09+5:302020-04-29T02:06:15+5:30
ज्ञानेश्वर जगताप आणि अमित निंबाळकर या दोन तरुणांनी जीवाची बाजी लावत तत्परतेने हा वणवा विझवून मोठी हानी टाळली. त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विनोद भोईर
पाली : येथील सरसगड किल्ल्यावर शुक्रवारी २४ एप्रिल रोजी रात्री वणवा लागला होता. काही वेळातच हा वणवा मानवी वस्तीजवळ पोहोचला असता. याबरोबरच वृक्षराजी आणि पशुपक्ष्यांचीदेखील हानी झाली असती. मात्र येथील ज्ञानेश्वर जगताप आणि अमित निंबाळकर या दोन तरुणांनी जीवाची बाजी लावत तत्परतेने हा वणवा विझवून मोठी हानी टाळली. त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सायंकाळी किल्ल्याला लागलेली आग भास्कर दुर्गे व राजेश इंदुलकर यांनी विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर ही आग पुन्हा भडकली व उग्र होत गेली. याबाबत अमित निंबाळकर यांनी आपला चित्तथरारक अनुभव सांगितला. शुक्रवारी रात्री ज्ञानेश्वर जगतापचा फोन आला. त्याने किल्ल्याावरील वणवा विझवायला ये म्हणून सांगितले, मग बॅटरी घेऊन तडक किल्ल्याच्या दिशेने निघालो. वरच्या माळावर पोहोचलो तर ज्ञाना एकटाच दिसला. म्हटले अजून कोण आहे का? दोघा-तिघांची नावे घेतली त्याने, म्हटले येतील ते येतील, आग वाढली तर जास्त वर जाता येणार नाही. मग दोघांनीही कोयता घेऊन सरळ आगीच्या दिशेने कूच केली. ज्ञाना बूट घालून तयारीत आला होता. मी मात्र साधी स्लीपर घालून आलो होतो. नावाप्रमाणे ती स्लिप करत होती. पहिला टप्पा विझवला, थोडी आग राहिली होती. ज्ञानाच्या म्हणण्याप्रमाणे येताना कुठून आलो ते कळायला राहू दे. समोर फक्त आग दिसत होती आणि जाऊन विझवायची आहे एवढेच डोक्यात होते. मग बघता बघता दोघांनी काम फत्ते केले. पायाला खाज, घामाच्या धारा, मध्येच निखारे, सहज प्रश्न आला मनात, मागे वळून बघू, बापरे वणव्याच्या नादात खूपच वर आलो होतो. उतरताना कळलं की अगदी सरळ चढाई केली होती आणि मग बसत-बसत उतरलो. सुरुवातीला राहिलेली आग विझवली आणि पुन्हा पालीत आलो, असे अमित निंबाळकर या तरुणाने सांगितले.
अशा प्रकारे या दोन तरुणांनी जीवाची पर्वा न करता सरसगडावरील आग विझवली आणि मोठे नुकसान टाळले. त्याबरोबरच येथील वनसंपदा, प्राणी व पशू यांनादेखील जीवदान दिले. या वेळी पाली वनविभागाचे वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांनी तरुणांचे अभिनंदन केले. तसेच सुधागड वनक्षेत्रात वणवा नियंत्रणासाठी वन विभागाकडे फायर ब्लोअर्स उपलब्ध आहेत. जिथे वणवा असेल त्या विभागातील आमच्या वनरक्षक, वनपाल किंवा वनक्षेत्र कार्यालयात संपर्क करावा. जेणेकरून आग लगेच आटोक्यात आणता येईल, असे शिंदे यांनी सांगितले.
बहुतांश वणवे मानवनिर्मित : वणव्यांमुळे सापांची संख्या व प्रजाती नष्ट होत आहेत. भारतीय वन सर्वेक्षणाच्या (एफएसआय) अहवालानुसार देशात सर्वाधिक वणवे लागणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या दहात आहे. बहुतांश वणवे मानवनिर्मित आहेत. वणवे पेटविल्यामुळे पक्ष्यांची अंडी, पिल्लेही जळून जातात. त्यामुळे त्यांची संख्याही रोडावत चालली आहे. हा वणवा एकदा पेटला की परिसरातील जंगल अगदी महिनाभरसुद्धा जळत राहू शकते. या वणव्यामुळे होणाºया उजाड डोंगरांमुळे सर्वत्र निसर्गसौंदर्याला, हिरवळीला हानी पोहोचून जंगलातील जैवविविधता, वन्यजीव, कीटक, पक्षी, सरपटणारे प्राणी आदी अनेकांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. औषधी वनस्पतीही नामशेष झाल्या आहेत. वणवा लागल्यानंतरच्या उपाययोजना हा कितीही प्रयत्न केला तरी अवघड विषय आहे. तेव्हा शक्य असेल तर निसर्ग वाचवायला या, कारण तोच आपला तारणहार आहे, असे अमित निंबाळकर याचे मत आहे.