कर्जत : गेल्या काही दिवसांत मुंबई, पुणे आणि औरंगाबाद येथे रुग्णांच्या नातेवाइकांकडून डॉक्टरांवर हल्ले होत आहेत. निवासी डॉक्टरांना मारहाण होत आहे. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी गुरुवार, २३ मार्च रोजी कर्जत तालुक्यातील सर्व डॉक्टरांनी एक दिवसाचा लाक्षणिक बंद केला. या वेळी डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवून या आंदोलनात सहभाग नोंदवून कर्जत तहसीलदारांना निवेदन दिले.डॉक्टरांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच निवासी डॉक्टरांच्या समर्थनार्थ कर्जत मेडिकल असोसिएशनच्या वतीने कर्जत तालुक्यात एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला होता. कर्जतमधील ज्येष्ठ डॉक्टर रमाकांत प्रधान यांच्या निवासस्थानाजवळ तालुक्यातील १२५ डॉक्टर जमा झाले. सर्वजण बाजारपेठेतून चालत तहसील कार्यालयावर गेले.कर्जत मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अनिरु द्ध जोशी, इंडियन मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डॉ. श्रीकांत डहाके, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल अध्यक्ष डॉ. अश्विनी कर्वे, डॉ. मनोहर साबणे, डॉ. प्रेमचंद जैन आदींसह सर्व डॉक्टरांनी तहसीलदार अविनाश कोष्टी यांना निवेदन दिले.खालापुरात डॉक्टर संपावर-वावोशी : डॉक्टरांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ खालापुरातील डॉक्टर २३ मार्चपासून संपावर जात असल्याचे निवेदन इंडियन मेडिकल असोसिएशनने खालापूरचे तहसीलदार राजेंद्र चव्हाण यांना दिले आहे.डॉक्टरांवर होत असलेल्या वारंवार हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यातील निवासी डॉक्टर संपावर गेले असून या डॉक्टरांच्या समर्थनार्थ २३ मार्चपासून इंडियन मेडिकल असोसिएन खोपोली शाखेच्या सर्व सदस्यांनी दवाखाने बंद ठेवण्याचे ठरविले आहे. मात्र अतितत्काळ सेवा सुरू राहील, असेही निवेदनात नमूद केले आहे. डॉक्टरांच्या संपाचा फटका सर्वसाधारण जनतेला पहिल्याच दिवशी बसल्याचे दिसून आले.शासनाने डॉक्टरांवरील हल्ले थांबवावेत यासाठी कठोर कायदा करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात के ली आहे. (वार्ताहर)
डॉक्टरांचा लाक्षणिक बंद
By admin | Published: March 24, 2017 1:17 AM