कर्जत - हातात धनुष्यबाण घेतलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगातील पहिला अश्वारूढ पुतळा खालापूर तालुक्यातील उंबर खिंड येथे उभारणार असून, यासाठी २५ कोटींचा निधी देण्याची शासनाची तयारी आहे. हा पुतळा उभारण्याची खुद्द मुख्यमंत्र्यांचीच इच्छा आहे, अशी घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे केली. कर्जत विधानसभा मतदारसंघात शिंदेसेनेचा मेळावा आणि पक्ष प्रवेश कार्यक्रम पोसरी येथील शिवतीर्थ सभागृहात आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, विधानसभा गटनेते आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेंद्र दळवी, महिला आघाडी संपर्क प्रमुख डॉ. शिल्पा देशमुख, शिंदेसेना उत्तर रायगड जिल्हाप्रमुख संतोष भोईर, जिल्हा संपर्कप्रमुख विजय पाटील, जिल्हा सल्लागार गोविंद बैलमारे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष हनुमंत पिंगळे, ‘आप’चे जिल्हाध्यक्ष शेखर जांभळे, युवासेना आणि उद्धवसेनेचे पदाधिकारी यांनी पक्ष प्रवेश केला.
१ फेब्रुवारी रोजी केली हाेती घाेषणासामंत यांनी या पूर्वी १ फेब्रुवारी २०२४ रोजी उंबर खिंड संग्रामाच्या ३६३व्या विजय दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्रमातही ही घोषणा केली होती. याला पुष्टी देताना त्यांनी इतिहासाचा आधार घेतला. उंबर खिंड येथे झालेल्या एका लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांनी धनुष्यबाण हाती घेतला होता, असेही त्यांनी सांगितले.