पद गेले तरी मुख्यमंत्री असल्यासारखे फिरताहेत, उदय सामंत यांची ठाकरेंवर नाव न घेता टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 12:37 PM2024-03-07T12:37:26+5:302024-03-07T12:49:05+5:30
शिवसेना शिंदे गटाचे अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या एमडी ग्रुपने आयोजित केलेल्या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला मंगळवारी सायंकाळी पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती दर्शवली.
अलिबाग : काहीजण मुख्यमंत्री पद गेले तरी मुख्यमंत्री असल्यासारखे टीका करत फिरत आहेत. ही खिलाडूवृत्ती नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केली. तसेच खिलाडीवृत्ती शिकायची असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचा आदर्श घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या एमडी ग्रुपने आयोजित केलेल्या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला मंगळवारी सायंकाळी पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी ते बोलत होते. माजी आमदार अनिकेत तटकरे, आमदार महेंद्र दळवी, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी मला क्रिकेटचा अनुभव आहे. त्यामुळे राजकारणात कोणाच्या गुगलीवर सिक्स मारायचा, कसा आऊट, लेग स्विंग टाकायचा आणि गुगली टाकायचा, कधी त्रिफळाचित करायचे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चांगले माहीत असल्याचे सांगितले.
टेनिस स्पर्धेला सहा महिन्यांपूर्वी राजाश्रय मिळाला. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन स्थापन करण्यात आली असून त्याचे अध्यक्षपद मला देण्यात आले आहे. भविष्यात टेनिस स्पर्धेतील खेळाडूंचे करिअर करण्यासाठी असोसिएशन काम करेल, असा विश्वासही सामंत यांनी बोलून दाखवला.
शेकापचे प्रशांत नाईक आणि आमदार महेंद्र दळवी हे व्याही आहेत. स्पर्धेमुळे एकत्र आले आहेत. भविष्यात राजकारणातही एकत्र या असे मत उदय सामंत यांनी बोलून दाखवले.