उद्योग मंत्री असूनही रोजगारी प्रश्न सोडविण्यात उदय सामंत अपयशी; पालकमंत्र्यांच्या कार्य शैलीवर रायगडचे शिवसैनिक नाराज

By राजेश भोस्तेकर | Published: December 9, 2023 05:39 PM2023-12-09T17:39:48+5:302023-12-09T17:40:03+5:30

शिवसेनेचे रायगडचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्योग मंत्री असूनही जिल्ह्यातील बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहेत.

Uday Samant failed to resolve the employment issue despite being the Minister of Industries Shiv Sainiks of Raigad are upset with the working style of the Guardian Minister | उद्योग मंत्री असूनही रोजगारी प्रश्न सोडविण्यात उदय सामंत अपयशी; पालकमंत्र्यांच्या कार्य शैलीवर रायगडचे शिवसैनिक नाराज

उद्योग मंत्री असूनही रोजगारी प्रश्न सोडविण्यात उदय सामंत अपयशी; पालकमंत्र्यांच्या कार्य शैलीवर रायगडचे शिवसैनिक नाराज

अलिबाग : शिवसेनेचे रायगडचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्योग मंत्री असूनही जिल्ह्यातील बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहेत. जिल्ह्यात पक्ष संघटना वाढीसाठी ही प्रयत्न करीत नसून शिवसैनिक यांच्याशी दीड वर्षात संवादही साधला नाही अशी नाराजी व्यक्त करून जिल्ह्यातील शिवसैनिकांनी घरचा आहेर दिला आहे. जिल्हा प्रमुख राजा केणी आणि संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या विषयी नाराजी रायगड लोकसभा मतदार संघाचे निरीक्षक मंगेश सातमकर यांच्या उपस्थितीत बोलून दाखवली. त्यामुळे उदय सामंत यांच्याबाबत जिल्ह्यातील शिवसैनिक यांच्याबाबत असलेली खदखद जिल्हा कार्यकारिणीच्या आढावा बैठकीतून बाहेर आली आहे. 

शिवसेना रायगड जिल्हा कार्यकारिणीची बैठक शनिवारी ९ डिसेंबर रोजी अलिबाग मधील खडताल पुल येथील होरिजान सभागृहात संपन्न झाली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने ४८ लोकसभा मतदार संघात आढावा बैठक घेतली जात आहे. रायगड लोकसभा मतदार संघात निरक्षक म्हणून मंगेश सातमकर यांच्याकडे धुरा दिली आहे. आढावा बैठकीत पदाधिकारी यांनी पालकमंत्री यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली. निरक्षक मंगेश सातमकर, आमदार महेंद्र दळवी, जिल्हाप्रमुख राजा केणी, संपर्क प्रमुख प्रकाश देसाई, अलिबाग तालुकाप्रमुख अनंत गोंधळी, जिल्हा संघटक दीपक रानवडे, महिला संपर्क प्रमुख संजिविनी नाईक, जिल्हा संघटीका शुभांगी करडे, तालुकाप्रमुख स्मिता चव्हाण यांच्यासह अलिबाग, मुरुड विधानसभा मतदार संघातील जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

महा विकास आघाडी सरकार काळात पालकमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांच्याकडे धुरा होती. अदिती तटकरे ह्या विश्वासात घेत नाहीत म्हणून शिवसेना आमदारांनी पालकमंत्री हटाव मोहीम घेतली. त्यानंतर सत्तांतर होऊन शिवसेना शिंदे गट आणि भाजप सत्तेवर आले. शिवसेनेचा पालकमंत्री रायगडला मिळावा अशी अपेक्षा जिल्ह्यातील आमदार यांची होती. त्यानुसार उद्योग मंत्री उदय सामंत यांना रायगडचे पालकमंत्री पद दिले. त्यामुळे शिवसेनेत आनंदाचे वातावरण होते. मात्र नवलाईचे नऊ दिवस संपले आणि उदय सामंत यांच्या बाबतीतही आता नाराजीचा सुरू शिवसैनिकांमध्ये निर्माण झाला आहे. 

शनिवारच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी आपल्या भाषणातून पालकमंत्री उदय सामंत यांच्या कार्य शैलीवर नाराजी व्यक्त केली. उदय सामंत हे उद्योग मंत्री आहेत. मात्र जिल्ह्यातील तरुणांना  रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करीत नाहीत. साधे रोजगार मेळावे घेत नाहीत. पक्ष संघटना वाढीसाठी काहीही प्रयत्न करीत नाहीत. शिवसैनिक यांच्याशीही दीड वर्षात संवाद साधला नसल्याची नाराजी राजा केणी यांनी आपल्या भाषणातून निरक्षक मंगेश सातमकर यांच्या समोर उघड केली. 

जिल्ह्याचे संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांनीही याबाबत भाषणातून दुजोरा दिला आहे. उद्योग मंत्री आमच्याकडे लक्ष देत नाही. आमदार महेंद्र दळवी हे काम करीत आहेत. पालकमंत्री जिल्ह्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. तर पदाधिकारी यांचीही कामे होत नाहीत. त्यामुळे त्याची एक बैठक होणे आवश्यक आहे. सत्ता असताना आणि पालकमंत्री उद्योग मंत्री असूनही न्याय मिळत नाही. ही खंत देसाई यांनी बोलून दाखवली. त्यामुळे शिवसेनेच्या पालकमंत्री विरोधात आता शिवसैनिक आक्रमक झाल्याचे बैठकीतून समोर आले आहे. 

सामंत नाराजीबाबत मंगेश सातमकर गप्प
शिवसेना पदाधिकारी यांनी पालकमंत्री आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या बाबत असलेली नाराजी व्यक्त केली. मंगेश सातमकर यांनी मात्र आपल्या भाषणातून सामंत यांच्या विषयी चकार शब्द न काढता पक्ष संघटन मजबूत करण्याबाबत मार्गदर्शन केले. आपली नाराजी वरिष्ठ पातळीवर कळवू असे बोलून वेळ मारली.
 

Web Title: Uday Samant failed to resolve the employment issue despite being the Minister of Industries Shiv Sainiks of Raigad are upset with the working style of the Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.