अलिबाग : क्रिकेट खेळ मी ही खेळलो असून सचिन तेंडुलकर झालो नाही. पण राजकारणात कोणाच्या गुगली वर सिक्स मारायचा कसा आऊट, लेग स्विंग टाकायचा आणि गुगली टाकायचा, कधी त्रिफळा चीत करायचे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली चांगले माहीत आहे. काहीजण मुख्यमंत्री पद गेले असूनही मुख्यमंत्री असल्यासारखे टीका करत फिरत आहेत. ही खिलाडूवृत्ती नसल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. खिलाडी वृत्ती जर शिकायची असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचा आदर्श घ्यावा लागेल अशी बोचरी टीकाही सामंत यांनी केली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे अलिबाग मुरुड विधानसभा आमदार महेंद्र दळवी याच्या एम डी ग्रुप आयोजित आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला मंगळवारी ५ मार्च रोजी सायंकाळी पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी आपल्या भाषणात सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. माजी आमदार अनिकेत तटकरे, आमदार महेंद्र दळवी, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी क्रिकेट स्पर्धेचे केलेल्या नियोजनबध्द आयोजनाबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्यासह आयोजकांचे अभिनंदन केले.
एकाद्याचे मंत्री पद गेले तर खिलाडू वृत्तीने स्वीकारले पाहिजे आणि मंत्रिपद गेले याची जाणीव व्हावी लागते. एखाद्या संघटनेचे पद गेले तर माझे पद गेले हे स्वीकारावे लागते. माझं मुख्यमंत्री पद गेले हे सुध्दा स्वीकारावे लागते. मुख्यमंत्री असल्यासारखे कायमस्वरूपी टीका करीत फिरणे ही खिलाडी वृत्ती होऊ शकत नाही. खिलाडी वृत्ती जर शिकायची असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचा आदर्श घ्यावा लागेल अशी जहरी टीका माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्या भाषणातून केली आहे.
टेनिस स्पर्धेला सहा महिन्यापूर्वी राजाश्रय मिळाला. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन स्थापन करण्यात आली असून त्याचे अध्यक्षपद मला देण्यात आले आहे. लेदर स्पर्धा खेळून आपले करियर बनवले जाते. तसेच भविष्यात टेनिस स्पर्धेतील खेळाडूना ही सुध्दा करियर करण्यासाठी असोसिएशन काम करेल असा विश्वासही पालकमंत्री उदय सामंत यांनी बोलून दाखवला.
शेकापचे प्रशांत नाईक आणि आमदार महेंद्र दळवी हे व्याही आहेत. स्पर्धेमुळे एकत्र आले आहेत. भविष्यात राजकारणात ही एकत्र या असे मत उदय सामंत यांनी बोलून दाखवले. क्रिकेट स्पर्धेमुळे दोन राजकीय नेते खेळासाठी आणि विकासासाठी एकत्र येतात. ही खिलाडू वृत्ती आहे. तसेच राजकारणाला स्पर्श न करता एकत्र येतात. भविष्यात दोन्ही पक्ष एकत्र यावे अशी माझी इच्छा आहे. असेही सामंत यांनी म्हटले आहे. तर अलिबागचा पुढील आमदार महेंद्र दळवी हेच होतील असा विश्वासही बोलून दाखवला आहे.