कोकणात ‘बारसू’वरून रणकंदन!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 05:22 AM2023-05-07T05:22:51+5:302023-05-07T05:24:51+5:30
उद्धव ठाकरेंकडून समर्थकांचा समाचार, राज ठाकरे यांनी टोचले कोकणवासीयांचे कान
महाड (रायगड) : ऐतिहासिक महाड क्रांतिभूमीत शनिवारी झालेल्या सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडून गेलेल्यांचा समाचार घेत देशाला दिशा देणारा महाराष्ट्र वाचवला पाहिजे. देशाला हुकूमशाही विचारातून वाचवले पाहिजे. यासाठी भाजपला तडीपार करा, असे आवाहन केले. कोकण उद्ध्वस्त होत असेल तर बारसूसारखा प्रयोग होऊ देणार नाही, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
“बजरंग दल ही देशभक्तांची संघटना, बंदी घालून काँग्रेसचा मतं मिळवण्याचा प्रयत्न”
चांदे क्रीडांगणावर झालेल्या सभेत व्यासपीठावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार चंद्रकांत खैरे, खासदार अरविंद सावंत आदी उपस्थित होते. उद्धव यांनी गद्दारांचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा निर्धार बोलून दाखवत आधी कोकणच्या माणसांची चाचणी करा, मग मातीची चाचणी करा. ऐकले नाही तर बारसूमध्ये महाराष्ट्र उतरवू, असा इशारा त्यांनी दिला.
फटाके थांबता थांबेनात
भाषण सुरू झाले आणि लावलेले फटाके थांबता थांबेनात. अखेर ठाकरे यांनी भाषण थांबवून ‘अरे, जरा पाणी ओता’ असे म्हणत ‘आधी विजय, मगच फटाके वाजवू’, असे सांगितले. शिवसैनिक पेटले की ऐकत नाहीत. मैदानात वाजणारे फटाके उद्या त्यांच्या बुडाखाली वाजतील, असा टोला हाणला.
महाडचे माजी आमदार दिवंगत माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप, पुत्र श्रेयस जगताप आणि बंधू हनुमंत जगताप यांच्यासह महाड तालुक्यातील शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
तुमच्या जमिनींचा होतोय व्यापार, जागे राहा...
तुमचे लोकप्रतिनिधी व्यापारी आहेत. कोकणात कोणत्या भागात प्रकल्प येणार आहे, हे त्यांना माहिती असते. ते कवडीमोलाने तुमच्या जमिनी घेतात आणि हजारपट दराने विकतात. तुम्हाला कळतच नाही का? अशा कोणालाही जमिनी विकू नका, जागे राहा, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकणवासीयांचे कान टोचले.
शनिवारी रत्नागिरीतील जाहीर सभेत राज यांनी कोकण विकासाच्या मुद्द्यावरून सध्याच्या आणि आधीच्या सरकारवर ताशेरे ओढले. याआधी एन्रॉन, अणुऊर्जा यांसारखे प्रकल्प येण्याआधीच कोकणी लोकांनी व्यापाऱ्यांना आपल्या जागा विकल्या. आता नाणार, बारसूबाबतही तेच होत आहे. जमिनी पायांखालून जात आहेत, तरीही कोकणी माणसाला कळत कसे नाही, असा प्रश्न करून ते म्हणाले, की नाणारमध्ये होणारा प्रकल्प अचानक बारसूत कसा गेला? कुठून आले हे नाव? असे प्रश्न त्यांनी केले.
पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष कोण
पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष आज येऊन गेले, असा टोला उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता राज यांनी लगावला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाला मी विरोध करत असल्याचे शरद पवार यांनी पसरवले. मात्र या पवार यांनी आजपर्यंत एकदाही आपल्या भाषणात शिवछत्रपतींचे नाव घेतलेले नाही. आपला विरोध शिवछत्रपतींच्या स्मारकाला असूच शकत नाही, असेही राज म्हणाले.