अलिबाग : तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणेच्या विरोधात अलिबाग मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर खटला सुरू होता. या खटल्याचा निकाल शनिवारी १ एप्रिल २०२३ रोजी लागला. अलिबाग मुख्य न्यायदंडाधिकारी एस. डब्लु. ऊगले यांनी नारायण राणे यांना गुन्ह्यातून दोषमुक्त केल्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे राणे याना मोठा दिलासा मिळाला आहे.
जन आशीर्वाद यात्रे निमित्त केंद्रीय मंत्री नारायण राणे याची सोमवारी 23 ऑगस्ट २०२१ रोजी दक्षिण रायगडमध्ये यात्रा सुरू झाली होती. या यात्रे दरम्यान महाड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह व्यक्तव्य केले होते. याबाबत महाड शहर पोलीस ठाण्यात राणे यांच्या विरोधात भा द वी कलम १५३ अ (१), (ब) १५३, अ (१), (क), १८९, ५०४, ५०५ (२), ५०६ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. राणे याना संगमेश्वर येथून अटक केली होती. महाड न्यायलयाने राणे यांना जामीन मंजूर केला होता.
महाड न्यायलायातून हा खटला अलिबाग येथे मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात वर्ग झाला होता. १ डिसेंबर २०२२ रोजी सुनावणीला हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने राणे याना दिले होते. त्यानुसार नारायण राणे हे आपल्या वकिलासह न्यायालयात हजर झाले. राणे यांचे वकील ऍड सतीश माने शिंदे यांनी दाखल केलेला गुन्हा हा खोटा असून त्यातून दोषमुक्त करावे आणि सुनावणीला हजर न राहण्यास परवानगी मिळावी यासाठी मुख्य न्यायदंडाधिकारी एस. डब्लु. ऊगले यांच्याकडे अर्ज केला आहे.
नारायण राणे यांच्या विरोधातील युक्तिवाद हा न्यायालयात पूर्ण झाला होता. निकाल येणे बाकी होते. शनिवारी १ एप्रिल २०२३ रोजी मुख्य न्यायदंडाधिकारी एस. डब्लु. ऊगले यांनी नारायण राणे यांना आरोपातून दोषमुक्त केले आहे. ऍड सतीश माने शिंदे याच्या सोबत ऍड अंकित बंगेरा यांनी राणेच्या वतीने काम पाहिले. राणे यांना आरोपातून दोषमुक्त केल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.