उद्धव ठाकरे रायगड जिल्ह्यातील जनतेसोबत साधणार संवाद
By निखिल म्हात्रे | Published: January 27, 2024 04:50 PM2024-01-27T16:50:54+5:302024-01-27T16:51:46+5:30
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे १ व २ फेब्रुवारी रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
निखिल म्हात्रे, अलिबाग : शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे १ व २ फेब्रुवारी रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात उध्दव ठाकरे हे जिल्ह्यात ठिकठिकाणी जनसंवाद मेळावा घेत जनातेसोबत संवाद साधणार आहेत. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त शिवसैनिकांमध्ये उत्साह पसरला आहे. या दौऱ्याची शिवसैनिकांनी जय्यत तयारी सुरू केली असून, प्रमुख पदाधिकारी विभागवार बैठका आयोजित करण्यात येत असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी शनिवारी (दि.२७) अलिबागमध्ये पत्रकार परिषदेत दिली.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याने या दौऱ्याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. आपल्या दौऱ्यात उध्दव ठाकरे हे १ फेब्रुवारी रोजी पेण, अलिबाग, रोहा येथे जनसंवाद मेळावा घेणार आहेत. तर २ फेब्रुवारी रोजी म्हसळा, माणगाव, महाड येथे जनसंवाद मेळावा घेणार आहेत.
उध्दव ठाकरे दौऱ्यात जनतेसोबत संवाद साधणार आहेत. यामुळे या दौऱ्याची जनतेत उत्सुकता आहे. शिवसैनिकांमध्ये उत्स्थाह पसरला आहे. उध्दव ठाकरे यांच्या दौऱ्याची माहिती जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी विभागवार बैठका आयोजित करण्यात येत आहेत. या दौऱ्यात उध्दव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेते माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, शिवसेना नेते सुभाष देसाई सहभागी होणार असल्याची माहिती, सुरेंद्र म्हात्रे यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार सतीश पाटील, उपजिल्हा संघटक अजित पाटील, अलिबाग मुरुड संघटक कृष्णा कडवे, अलिबाग तालुका प्रमुख शंकर गुरव, महिला आघाडी अलिबाग संघटिका स्नेहल देवळेकर, राखी खरवले, संदिप पालकर, राखी खरवले यांच्यासह अलिबाग तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.