ठाकरेंच्या अडचणी वाढणार?; १९ बंगल्यांच्या कथित घोटाळा प्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक, सरपंचांवर गुन्हा दाखल

By राजेश भोस्तेकर | Published: February 24, 2023 11:03 AM2023-02-24T11:03:49+5:302023-02-24T11:04:59+5:30

मुरुड तालुक्यातील कोर्लई येथे ९ एकर जागा उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांच्या नावे खरेदी केली आहे. ही जमीन आर्किटेक्ट कै अन्वय नाईक यांच्याकडून २०१४ साली खरेदी केली आहे. या जागेत १९ बंगले असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या वारंवार करीत होते.

Uddhav Thackeray's problems will increase A case has been registered against the Gram Sevak and Sarpanch in the alleged scam of 19 bungalows | ठाकरेंच्या अडचणी वाढणार?; १९ बंगल्यांच्या कथित घोटाळा प्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक, सरपंचांवर गुन्हा दाखल

ठाकरेंच्या अडचणी वाढणार?; १९ बंगल्यांच्या कथित घोटाळा प्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक, सरपंचांवर गुन्हा दाखल

googlenewsNext

अलिबाग : मुरुड तालुक्यातील कोर्लई येथे नऊ एकर जागा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आमदार रवींद्र वायकर याच्या पत्नी मनीषा वायकर याच्या नावे आहे. या जागेतील कथित १९ बंगल्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही बाब लपून ठेवली असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या सातत्याने करत होते. या प्रकरणाबाबत सोमय्या हे गुन्हा दाखल करण्याबाबत प्रयत्न करीत होते. अखेर गुरुवारी २३ फेब्रुवारी २०२३ रोजी रेवदंडा पोलीस ठाण्यात श्रीमती संगिता लक्ष्मण भांगरे, (ग्रामविकास अधिकारी मुरुड) यांच्या तक्रारीनुसार कोर्लई ग्रामपंचायत अधिकारी व तत्कालीन सरपंच,  सदस्य यांच्या विरुद्ध फसवणूक, संगनमत, १९ बंगल्यांच्या रेकॉर्डमध्ये खाडाखोड करणे यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

मुरुड तालुक्यातील कोर्लई येथे ९ एकर जागा उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांच्या नावे खरेदी केली आहे. ही जमीन आर्किटेक्ट कै अन्वय नाईक यांच्याकडून २०१४ साली खरेदी केली आहे. या जागेत १९ बंगले असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या वारंवार करीत होते. याबाबत कोर्लई ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सोमय्या पाठपुरावा करीत होते. रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. 

उद्धव ठाकरे यांनी मुखमंत्री असताना दबाव आणल आणि अधिकाऱ्यांनी कागदपत्रात छेडछाड केल्याचे सोमय्या यांचा आरोप आहे. त्यानुसार अखेर गुरुवारी २३ फेब्रुवारी रोजी मुरुड पंचायत समितीच्या ग्रामविकास अधिकारी संगिता लक्ष्मण भांगरे यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार तत्कालीन ग्रामसेवक श्रीमती देवंगणा वेटकोळी, विनोद मिंडे, वेदिका म्हात्रे, तत्कालीन सरपंच प्रशांत मिसाळ, गोविंद वाघमारे, रेश्मा मिसाळ, रीमा पिटकर आणि तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य यांच्या विरोधात फसवणूक, संगनमत, १९ बंगलो चे रेकॉर्ड मधे खाडाखोड करणे यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. 

एफआयआर क्रमांक २६, आयपीसी कलम ४२०, ४६५, ४६६, ४६८ आणि ३४ अन्वये तत्कालीन तीन ग्रामसेवक, चार सरपंच आणि तत्कालीन सदस्य याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास मुपडे हे करीत आहेत.

कोर्लई जागेत नक्की काय आहे -
रेवदंडा मुरुड रस्त्यावर कोर्लई गावापासून एक किलोमीटरवर समुद्र किनारी बाजूला ९ एकर जागा आहे. जागेला कंपाऊंड आहे. या जागेत सध्या 
दोन मोडकी घरे, एक विहीर, नारळ, चिकुची झाडे, खत निर्मित टाक्या आहेत. मात्र कथित १९ बंगले कुठेही दिसत नाहीत. जागेत गवत वाढलेले आहे.

Web Title: Uddhav Thackeray's problems will increase A case has been registered against the Gram Sevak and Sarpanch in the alleged scam of 19 bungalows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.