धाटाव : रोहा तालुक्यातील तांबडी येथील पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी न्याय देण्यासाठी आणि आरोपींना जरब बसण्यासाठी फाशीची शिक्षा सुनावली जावी, यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रखर युक्तिवाद तज्ज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.
रोह्यात ज्येष्ठ नागरिक सभागृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून लवकरात लवकर नराधमांना फाशी देण्यात यावी, असेही ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील, रोहा तालुका अध्यक्ष विनोद पशिलकर यांसह कार्यकर्ते तर रोह्यातील पत्रकार उपस्थित होते. या संदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी केली होती. ही मागणी करताच, उज्ज्वल निकम यांनीही होकार दिलेला आहे. तपास योग्य दिशेने होत असल्याने आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले असल्याचे तटकरे म्हणाले.