नेरळ : कर्जत तालुक्यातील प्रमुख असणाऱ्या उल्हास व चिल्हार नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक पुलांवरून पाणी गेल्याने सुमारे ५० हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. कर्जत तालुक्यात अनेक ठिकाणी दरड कोसळून माती, दगड रस्त्यावर आले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते खचले, झाडे कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. शेतीमध्येही पाणी साचल्याने प्रचंड नुकसान झाले आहे.सतत तीन दिवस पावसाने धुमाकूळ घातल्याने अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. या पावसात बेकरे येथील धनगर वाडा येथील घर कोसळून मोठे नुकसान झाले. अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे.नेरळ ते वांगणीदरम्यान रेल्वेमार्ग पाण्याखाली आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. कामावर गेलेले अनेक जण कल्याण, बदलापूरदरम्यान अडकून पडले. अनेक रस्त्यांवर झाडे पडली आहेत, तर ररस्त्यालगत दरडी कोसळल्या आहेत. धोमोते पुलावरील रेलिंग तुटल्याने अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. एकूणच पावसामुळे परिसर जलमय झाल्याचे दिसून आले.नेरळ - माथेरान घाटात सतत दोन दिवस दरडी कोसळण्याच्या घटना घडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. कर्जत तालुक्यातील दहिवली, सवरोली, आंबिवली, मोहाची वाडी पुलावरून पाणी गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शिंगढोल-आंबिवली रस्त्याच्या पुलावरूनदेखील पाणी गेल्याने पुलाचा काही भाग खचला. माले रस्ताही मोठ्या प्रमाणात खचला आहे. परिसरातील धरणे, धबधबे दुथडी भरून वाहत असल्याने पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.नेरळ बिरदोले गावात पाणी शिरल्याने शेतकरी आणि गुरांना वाचविण्यासाठी स्थानिकांचे प्रयत्न सुरू आहेत.
उल्हास, चिल्हार नद्या दुथडी भरून वाहू लागल्या; पुलावरून पाणी गेल्याने गावांचा संपर्क तुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 12:04 AM