नेरळ : कर्जत उल्हास नदीला सध्या जलपर्णीचा विळखा बसला आहे. दोन दिवसांपूर्वी ही जलपर्णी काढण्याचे काम कर्जत परिसरात हाती घेण्यात आले आहे. परंतु काढलेली जलपर्णी ही नदीपात्रातून काढून बाहेर न टाकता नदीपात्रातच टाकली जात असल्याने ही जलपर्णी नेरळ, शेलू, वांगणी परिसरात पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊन नदीपात्रातील पाणी दूषित झाले असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
जिल्ह्णातील जवळजवळ सर्वच नद्यांमध्ये उन्हाळ्यात जलपर्णी वाढलेली दिसते. जलपर्णी असेल तर नदीचा प्रवाह खुंटतो. डासांचा प्रादुर्भाव वाढतो यामुळे मग जलपर्णी काढण्यासाठी मोहीम राबवली जाते. अशीच मोहीम कर्जत परिसरात सुरू करण्यात आली आहे. नदीपात्रात काढून जलपर्णी ही नदीबाहेर न टाकता नदीच्या पाण्यात टाकली जात आहे. त्यामुळे नदीचे पाणी दूषित झाले आहे. उल्हास नदीच्या पाण्यावर अनेक पाणी योजना अवलंबून आहेत, परंतु अनेक पाणी योजनांना फिल्टर प्लान्ट नसल्याने हे दूषित पाणी घरा-घरात जात असल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून ही जलपर्णी नेरळ, दहिवली, बिरदोले, शेलू, वांगणी येथील उल्हास नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहत असल्याचे मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. त्यामुळे जलपर्णी लवकर काढण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
सांडपाणी नदीपात्रातच्शहराच्या सांडपाण्यातून वा रासायनिक खतांचा वापर केलेल्या शेतजमिनीतून झिरपणाऱ्या पाण्यातील, सांडपाण्यामुळे जलपर्णी वाढते. ही पोषक द्रव्ये पाण्यात मिसळणे जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत जलपर्णीची वाढ अनिर्बंधपणे होत राहते. याच पोषक द्रव्यांवर व इतर सेंद्रिय पदार्थांवर जीवाणूंचीही वाढ होत असते. अनेक रोगजंतू पाण्यात टिकून राहण्यात व त्यांची वाढ होण्यात या दूषित पदार्थांचा सहभाग असतो. त्यामुळे नदीपात्रात सांडपाणी सोडणेही तितकेच धोक्याचे आहे. कर्जत, नेरळ परिसरात तर अनेक बिल्डर, तसेच गावातील निघणारे सांडपाणी नदीपात्रात सोडले जाते, परंतु यावर प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने त्याचा त्रास अनेक गावातील नागरिकांना भोगावा लागत आहे. जोपर्यंत नदीपात्रात सांडपाणी सोडण्याचे कमी होत नाही तोपर्यंत जलपर्णी वाढण्याचे प्रमाण कमी होणार नाही.
गेल्या अनेक दिवसांपासून कर्जत परिसरात काढलेली जलपर्णी उल्हास नदीपात्रात टाकण्यात येत आहे. दहिवली, नेरळ परिसरात ही जलपर्णी पाण्यात तरंगलेली दिसत आहे. त्यामुळे परिसरात पाणी दूषित झाले आहे, प्रशासनाने यावर लक्ष देऊन पाण्यात आलेली जलपर्णी काढून टाकावी आणि नदीपात्रात जलपर्णी टाकणाऱ्यांवर कारवाई करावी.- सावळाराम जाधव, माजी सरपंच, नेरळ