उमरोली ग्रामस्थांना मिळणार अखेर दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 03:12 AM2018-12-17T03:12:33+5:302018-12-17T03:13:21+5:30

गाढी नदीवर बांधणार नवीन पूल : दीड कोटींचा खर्च; सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती

Umaroli villagers get relief after finally | उमरोली ग्रामस्थांना मिळणार अखेर दिलासा

उमरोली ग्रामस्थांना मिळणार अखेर दिलासा

googlenewsNext

मयूर तांबडे

पनवेल : मागील अनेक वर्षांपासून दळण-वळणाविषयी भेडसावणारा उमरोली ग्रामस्थांचा प्रश्न आता निकाली निघणार आहे. येथील गाढी नदीवर नवीन पूल बांधण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. या पुलासाठी दीड कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत, त्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे.

पनवेल शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर उमरोली गाव वसलेले आहे. ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी येथील गाढी नदीवर पूल आहे; परंतु हा पूल अत्यंत जुना व लहान असल्याने पावसाळ्यात नदीचे पाणी पुलावर चढते. त्यामुळे ग्रामस्थांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. जून ते सप्टेंबर २०१७ मध्ये उमरोली गावाचा १९ वेळा संपर्क तुटला होता. तर २०१८ मध्ये १० ते १२ वेळा या गावाचा संपर्क तुटला होता, त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत हा उमरोली पूल शाळकरी मुलांसाठीही धोकादायक ठरत होता. ग्रामस्थांना जीवावर उदार होऊन नदीवर असलेल्या फरशीवरून (छोटासा पूल) प्रवास करावा लागतो. याच पुलावरून विद्यार्थ्यांना जावे लागत असल्याने पालकांच्या मनात नेहमीच धाकधूक असते. या पुलावरून जात असताना २०१६ मध्ये शुभम मढवी हा तरुण खाली पडला होता. सुदैवाने नागरिकांनी त्याला बाहेर काढले होते. २०१७ मध्ये झारखंड येथील २२ वर्षीय अजय सिंग हा तरुण पुलावरून खाली पडला होता. पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून त्याचे प्राण वाचविले होते. पावसाळ्यात या पुलावर अनेक लहान-मोठे अपघात घडले आहेत, त्यामुळे गाढी नदीवर नवीन पूल बांधावा, यासाठी उमरोली ग्रामपंचायतीनेही पाठपुरावा केला होता. अखेर त्याला यश आले असून, जुन्या छोट्या पुलाच्या बाजूलाच नवीन पूल बांधण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. या पुलाच्या कामासाठी नाबार्डने एक कोटी ४५ लाख १४ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

‘लोकमत’चा पाठपुरावा
उमरोली येथे गाढी नदीवर नवीन पूल बांधावा, यासाठी ‘लोकमत’मधून सातत्याने वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. येथील ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासाविषयी नियमित पाठपुरावा करण्यात आला. अखेर ‘लोकमत’च्या प्रयत्नाला यश आले असून, लवकरच या ठिकाणी नवीन पूल उभारला जाणार आहे.

गाढी नदीवरील उमरोली गावासाठीचा नवीन पूल मंजूर झाला आहे. त्यासाठी दीड कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. पुढील दीड ते दोन महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
- राजीव डोंगरे,
अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

येथील उंच पुलासाठी रायगड जिल्हा परिषदेकडे व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव देण्यात आलेला होता. अखेर येथील नवीन पुलाला मंजुरी मिळाली असल्याने नागरिकांचे प्रश्न सुटणार आहेत.
- अब्राल शेख,
ग्रामसेवक,
उमरोली ग्रामपंचायत

Web Title: Umaroli villagers get relief after finally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड