- जयंत धुळप
अलिबाग, दि. 14 - राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर लिमिटेड या देशातील सर्वाधिक खत निर्मितीत अग्रेसर सरकारी क्षेत्रातील खत कारखान्याच्या रायगड जिल्ह्यातील थळ येथील कारखान्यात व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (मॅनेजमेंट ट्रेनी) म्हणून रुजू झालेले उमेश धात्रक यांनी अथक मेहनतीने यशस्वी वाटचाल करीत गुरुवारी कंपनीचे सर्वोच्च पद असलेल्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी विराजमान झाले आहेत.
त्यांनी पुणे कॉलेज ऑफ इंजिनीयरींग येथून बॅचलर ऑफ इंजिनीयरींग पदवी संपादन केली आहे. ऑगस्ट 1981 मध्ये ते आरसीएफ कंपनीमध्ये व्यवस्थापक प्रशिक्षणार्थी म्हणून सामील झाले. 36 वर्षांहूनही अधिक काळ आपल्या दीर्घ कारिकर्दीत त्यांनी तांत्रिक सेवा, अमोनिया प्लान्ट, युरिया प्लांट , पॉवर प्लांट, स्टीम जनरेशन प्लांट, बॅगिंग प्लँट तसेच हेल्थ सव्र्हिसेस डिपार्टमेंट आदि विविध पदांवर काम केले आहे.
धात्रक यांचे विविध मासिकांमधून सिंथेसीस गॅस कॉम्प्रेसर मधील उच्च कंपनांच्या समस्येवरील उपाययोजना या विषयावरील लेख प्रकाशित झाले आहेत. शिस्त, कठोर परिश्रम आणि कंपनी करीता संपूर्ण कटीबद्ध हे त्यांच्या यशाचे गमक आहे.संगीत आणि संस्कृतीक विषयातील विशेष गोडी असणारे धात्रक योगाभ्यासात रुची असणारे आहेत.
आरसीएफच्या इतिहासात आरसीएफमध्ये कार्यरत असलेले कंपनीच्या सर्वोच्चपदी विराजमान होणारे धात्रक हे पहिलेच अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक झाले असल्याने आरसीएफ थळ व चेंबूर येथील कारखान्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.