उमटे धरणातील गाळ जेएसडब्ल्यू काढणार?; पाण्याचा १० कि.मी.च्या परिघातील गावांना धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 11:59 PM2019-05-16T23:59:58+5:302019-05-17T00:00:07+5:30
उमटे धरणामध्ये मोठ्या संख्येने साचलेला गाळ उपसण्यासाठी मोठी यंत्रणा उभी करावी लागणार आहे. जिल्हा प्रशासनाकडे अशी व्यवस्था नसल्याने ही जबाबदारी जेएसडब्ल्यू या खासगी कंपनीवर टाकण्यात आली आहे.
- आविष्कार देसाई
अलिबाग : उमटे धरणामध्ये मोठ्या संख्येने साचलेला गाळ उपसण्यासाठी मोठी यंत्रणा उभी करावी लागणार आहे. जिल्हा प्रशासनाकडे अशी व्यवस्था नसल्याने ही जबाबदारी जेएसडब्ल्यू या खासगी कंपनीवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे कंपनीकडून हिरवा कंदील मिळताच पुढील काही दिवसांमध्ये गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. या कामाला उशीर झाल्यास पावसाच्या कालावधीत गाळ काढता येणार नाही. त्यामुळे धरणाच्या १० किलोमीटरच्या परिघामधील गावे, शेती हे धरणाच्या पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने येणाऱ्या आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी तातडीने गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
पावसाळ््यात येणाºया आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी विविध उपाययोजनांवर भर देण्यात येतो, मात्र प्रत्यक्षात आपत्तीशी दोन हात करताना निसर्गाच्या कोपापुढे गुडघे टेकावेच लागतात. नद्या, धरणांना पूर आल्याने गावेच्या गावे उद्ध्वस्त झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. अशीच भीती सध्या रामराज परिसरातील उमटे धरणाच्या बाबतीमध्ये ग्रामस्थांना सतावत आहे. धरणातील गाळ काढण्याच्या कामाला १५ मेची डेडलाइन उलटून गेली तरी सुरुवात झाली नाही. त्यामुळे ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. धरणातील गाळ काढण्याच्या कामाला १५ मेनंतर सुरुवात करण्यात येणार असल्याचे रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर यांनी सांगितले होते. नुकतीच आपत्तीच्या झालेल्या आढावा बैठकीमध्ये उमटे धरणातील गाळ उपसण्याच्या कामाचा विषय चर्चेला आला होता. धरणातील गाळ बरीच वर्षे काढला नाही. त्यामुळे पावसाच्या कालावधीमध्ये नदीचे पात्र लवकर भरून उमटे धरणातून ओव्हर फ्लो सुरू होतो. धरणातून फेकले जाणारे अतिरिक्त पाणी सुमारे १० किलोमीटरच्या परिघात पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरे, शेती, गोठ्यांमध्ये पाणी घुसून मोठ्या प्रमाणात हानी होण्याची भीती ग्रामस्थ अॅड. राकेश पाटील यांनी व्यक्त केली. ९० च्या दशकात आलेल्या जांभूळपाडा पुराची तसेच २६ जुलै २००५ च्या अतिवृष्टीचा हवाला त्यांनी दिला. मोठ्या संख्येने मनुष्य आणि वित्त हानी झाल्याची आठवणही करुन दिली.
प्रशासनाने उमटे धरणातील गाळ काढण्यासाठी जबाबदारी जेएसडब्ल्यू या खासगी कंपनीवर सोपवली आहे. परंतु अद्यापही गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झालेली नसल्याने ग्रामस्थ चांगलेच हवालदिल झाले आहेत. २०१८ च्या पावसाळ््याच्या आधी धरणाला मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी भगदाड पडले होते. ग्रामस्थांचा आवाज लोकमतने लावून धरल्याने अखेर प्रशासनाला जाग आली. याची गंभीर दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने धरणाची डागडुजी केली होती, असे ग्रामस्थ अॅड. कौस्तुभ पुनकर यांनी स्पष्ट केले. आताच्या पावसामध्ये धरणातील गाळ काढण्यात आला नाही तर पाण्याचा दाब वाढून धरणातील पाणी सर्वदूर पसरणार आहेच शिवाय धरणाच्या भिंतीलाही धोका पोचण्याची शक्यता असल्याचे बोरघर ग्रामपंचायतीचे सदस्य अॅड. पुनकर यांनी स्पष्ट केले.
धरणातील गाळ काढण्याबाबत गेल्या तीन महिन्यापासून जिल्हा परिषदेच्या संपर्कामध्ये आहोत. १५ मेनंतर धरणातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात होईल असे संजय वेंगुर्लेकर यांनी सांगितले होते. प्रशासनाला ग्रामस्थांचा जीव धोक्यात घालण्याचा कोणताच अधिकार नाही. त्यांनी तातडीने गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करावी अशी मागणी काँग्रेसचे नदीम बेबन यांनी केली.
३० दशलक्ष घनफूट पाणी कमी
रामराज परिसरात या धरणाची निर्मिती १९७८ साली करण्यात आली होती. त्यानंतर १९९५ साली हे धरण प्राधिकरणाकडून रायगड जिल्हा परिषदेला हस्तांतरित करण्यात आले होते. त्यामुळे धरणाची सर्वस्वी जबाबदारी ही जिल्हा परिषदेवर आहे. उमटे धरणाची साठवण क्षमता ८७ दशलक्ष घनफूट आहे. पाण्याची शेवटची पातळी ४० मीटर, धरणाची उंची ५६.४० मीटर आहे. सद्यस्थितीत धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पाण्याची साठवण क्षमता सुमारे ३० दशलक्ष घनफूट कमी झाली आहे.
३०० ट्रक गाळाची शक्यता
धरणाचे पात्र मोठे आहे, परंतु बरीच वर्षे गाळ न काढल्याने थोड्याशा पावसात देखील लगेच ओव्हर फ्लो होते. धरणातून सुमारे एक हजार ८०० ब्रास गाळ म्हणजेच सुमारे ३०० हायवा ट्रक भरून निघण्याची शक्यता आहे. यासाठी मोठ्या संख्येने जेसीबी, डम्पर आणि कामगारांची आवश्यकता लागणार आहे. जिल्हा प्रशासनाकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात सुविधा नसल्याने जेएसडब्ल्यू या खासगी कंपनीला साकडे घालण्यात आले आहे. त्यांनी हिरवा कंदील दिल्यावरच प्रत्यक्ष गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
धरणातील गाळ काढण्याबाबत आपत्ती व उपाययोजनेच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. धरणातून सुमारे ३०० ट्रक भरून गाळ निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडे तशा सुविधा नाहीत. त्यामुळे जेएसडब्ल्यू या खासगी कंपनीची मदत घेण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी घेतला. त्यानुसार कंपनीला कळवण्यात आले आहे. लवकरच त्यांच्याकडून कामाला सुरुवात करण्यात येईल.
- संजय वेंगुर्लेकर, कार्यकारी अभियंता