उमरोली ग्रामपंचायतीचे डम्पिंग बंद
By Admin | Published: July 17, 2017 01:27 AM2017-07-17T01:27:51+5:302017-07-17T01:27:51+5:30
उमरोली ग्रामपंचायत हद्दीतील गावांमधील कचरा हा वावे गावच्या रहदारीच्या रस्त्यावर असलेल्या डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकण्यात येत होता.
कांता हाबळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ : उमरोली ग्रामपंचायत हद्दीतील गावांमधील कचरा हा वावे गावच्या रहदारीच्या रस्त्यावर असलेल्या डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकण्यात येत होता. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरून वावे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले होते. त्यामुळे वावे ग्रामस्थांनी हे डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी जिल्हा परिषद आणि कर्जत पंचायत समितीकडे तक्र ार केली होती. या संदर्भात वरिष्ठ कार्यालयाने हे डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचे आदेश दिल्याने हे डम्पिंग ग्राउंड शुक्रवारी सायंकाळी बंद करण्यात आले आहे.
उमरोली ग्रामपंचायत हद्दीतील अनेक गावांमधील कचरा आणि स्थानिक खासगी रुग्णालयातील जैविक कचरा या डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकण्यात येत होता. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता. पावसाळ्यात तर हा कचरा नदी आणि परिसरात पसरत आहे. त्यामुळे या डम्पिंग ग्राउंडला ग्रामस्थांनी विरोध केला होता. हे डम्पिंग ग्राउंड बंद करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी पंचायत समिती कर्जत आणि जिल्हा परिषद रायगड यांच्याकडे केली होती. त्यानुसार रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी आणि तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या जागेची पाहणी केली होती. ग्रामपंचायत ही स्थानिकांच्या आरोग्याबाबत कोणतीही काळजी घेत नसल्याचे यावरून दिसून आले होते. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कर्जत यांनी हे डम्पिंग ग्राउंड दुसरीकडे हलवून हे डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचे आदेश उमरोली ग्रामपंचायतीला दिले होते.
तसेच हे डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा नीलिमा पाटील, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सुदाम पेमारे, नारायण डामसे यांनीही पुढाकार घेतला होता. त्यानुसार शुक्र वारी १४ जुलै रोजी वावे गावाजवळ असलेले डम्पिंग ग्राउंड ग्रामपंचायतीने बंद केले आहे. यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त के ले आहे.