मुरुड जंजिरा : श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय यशवंतनगर - नांदगाव हायस्कूल ही माध्यमिक शाळा मुख्य रस्त्यालाच लागून आहे. या शाळेच्या मुख्य गेटच्या काही अंतरावर भाजी विकण्यासाठी शेड बनवली होती. हा रस्ता मुंबईकडे जाणारा असल्याने या रस्त्यावरून असंख्य वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. नांदगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक चिंतामणी जोशी यांनी प्रशासनाला सदरचे बांधकाम हलवा, अन्यथा उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. याबाबतचे रीतसर निवेदन जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक तहसीलदार मुरुड पोलीस ठाणे व सार्वजनिक बांधकाम खात्याला दिले.
मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव विभागाचे बिट हवालदार सचिन वाणी व पोलीस शिपाई परेश म्हात्रे यांनी हे अनधिकृत बांधकाम केले होते त्यांचा शोध घेत त्यांची मुरुड पोलीस ठाण्यात बैठक आयोजित केली.सचिन वाणी यांनी उपस्थितांना सांगितले, या शाळेमध्ये आपलीच मुले शिकत आहेत. लोकांनी रस्त्यावर भाजी घेण्यास सुरुवात केली व त्याच वेळी शाळा सुटल्यास मुले शाळेतून बाहेर आल्यावर धोका निर्माण होऊ शकतो. मुलांचे हित पाहून भाजी विक्रेत्यांनी स्वतःहून बांधकाम हटविले.