म्हसळा येथे अनधिकृत मोबाइल टॉवर; नगरपंचायतीकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 01:04 AM2019-12-30T01:04:43+5:302019-12-30T01:04:52+5:30
रेडिएशनचा आरोग्यावर परिणाम होत असल्याने विरोध
- उदय कळस
म्हसळा : शहरामध्ये पोलीस ठाण्याच्या समोर भर वस्तीमध्ये मोबाइलच्या अनधिकृत टॉवरचे काम जोमाने सुरू आहे. या मोबाइल टॉवर बांधणीच्या विरोधात या परिसरातील नागरिकांनी म्हसळा नगरपंचायतीमध्ये तक्रार अर्ज देऊनही हे काम सुरू असल्याने नागरिकांच्या तक्रारीला नगरपंचायतीने केराची टोपली दाखविल्याचे निदर्शनास येत आहे.
म्हसळा पोलीस ठाण्याच्या समोर डॉ. ए. के. जलाल यांच्या मालकीच्या इमारतीवर दोन वर्षांपूर्वी एका मोबाइल टॉवरचे काम सुरू करण्यात आले होते. परंतु मोबाइल टॉवरमुळे होणाऱ्या रेडिएशनचा मनुष्याच्या आरोग्यावर होणाºया दुष्परिणामाची जाणीव झालेल्या या परिसरातील सुजाण नागरिकांनी या अनधिकृत मोबाइल टॉवरविरोधात म्हसळा नगरपंचायतीमध्ये शेकडो नागरिकांच्या सह्यांनिशी तक्रार अर्ज दिला होता; त्यानुसार काही काळापुरते या टॉवरचे काम बंद होते. परंतु या मोबाइल टॉवर बांधणीचा कंत्राटदार बरोबर सुट्टीच्या दिवशी काम सुरू ठेवत असे. त्याप्रमाणे या मोबाइल टॉवरचे काम जवळजवळ पूर्णत्वास गेलेले दिसत आहे. तरीही म्हसळा नगरपंचायत प्रशासन या टॉवरवर कारवाई करण्याऐवजी तक्रारदार नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देत आहे, असे या तक्रारदारांपैकी एक अनिकेत पानसरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
जर या टॉवरचे काम बंद करून हा मोबाइलचा टॉवर म्हसळा शहरातून हद्दपार करण्यात आला नाही, तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा अनिकेत पानसरे, जहूर हुर्जुक व त्यांच्या सहकाऱ्यांनी नगरपंचायतीला दिला आहे.
मोबाइल टॉवरमधून उच्च प्रतीच्या लहरी निघतात. त्या उच्च लहरींमुळे वातावरणातील प्रदूषण वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. त्या लहरींचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होतो असे सांगितले जाते. सोबतच पशू-पक्ष्यांवरही त्याचा परिणाम होतो. टॉवर उभारण्यासाठी शासनाने काही नियम केले आहेत; मात्र या नियमांना धाब्यावर बसवून टॉवरचे काम सुरू आहे. तरी ते त्वरित बंद करण्यात यावे.
- अनिकेत पानसरे, तक्रारदार
म्हसळा नगरपंचायतीने टॉवर बंद करण्यास सांगितले आहे. बंद न केल्यास संबंधितांना नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
- मनोज उकिर्डे, मुख्याधिकारी, नगरपंचायत
टॉवर काम करणाºया संबंधितांना नगरपंचायतीने तोंडी सांगूनदेखील थांबविले नाही. त्यांना नगरपंचायत नोटीस देईल व नोटीस देऊन काम थांबले नाही, तर त्यांच्यावर कायद्याच्या चौकटीत राहून योग्य ती कारवाई करू. वेळ आल्यास त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल.
- जयश्री कापरे, नगराध्यक्ष, नगरपंचायत म्हसळा