समुद्रकिनारी अनधिकृत व्यवसायांचे पेव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 01:25 AM2019-12-26T01:25:33+5:302019-12-26T01:26:01+5:30
प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी : अलिबागमध्ये मासेमारी जाळ्यांचे नुकसान, अपघाताची शक्यता
अलिबाग : पर्यटकांना समुद्रकिनारी मौजमजा करता यावी, यासाठी अलिबाग समुद्रकिनारी विविध मनोरंजनाची साधने ठेवण्यात आली आहेत. यातील विशेष बाब म्हणजे बहुतांश व्यावसायिकांकडे परवानाच नसल्याचे समोर आले आहे. अवैध पद्धतीने व्यवसाय करणाऱ्यांकडून एखादा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. समुद्रकिनारी अनधिकृत सुरू असलेले व्यवसाय बंद करावेत, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड, रायगड जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले
आहे.
मुंबई-पुण्यातील पर्यटक मोठ्या संख्येने अलिबागला पर्यटनासाठी येतात. येथील विस्तृत समुद्रकिनारे पर्यटकांच्या पसंतीस उतरत असल्याने येथील गर्दीचा आकडा हा दिवसेंदिवस अधिक वाढत आहे. येणाºया पर्यटकांचे मनोरंजन करता यावे, यासाठी अलिबाग समुद्रकिनारी जलक्रीडेसाठी स्पीड बोट, जेटस्की, बनाना राइड, बम्पर राइड, घोड्याची रपेट, घोडागाडी अशा विविध प्रकारचा व्यवसाय स्थानिकांसह पर जिल्ह्यातील व्यावसायिकांनी सुरू केला आहे. गेल्या काही वर्षामध्ये जलक्रीडा साधने पर्यटकांसाठी खुली करणाºया व्यावसायिकांची संख्या कमालीची वाढल्याचे दिसून येते. घोडागाडी, एटीव्ही राइड, उंटवाले यांनी किनारा काबीज केल्याने स्थानिकांसह पर्यटकांना किनाºयावरून चालणे कठीण झाले आहे. विशेषत: लहान मुले आणि वयोवृद्धांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा
लागत आहे. मनोरंजनाच्या साधनांना ठरावीक ठिकाणे दिली पाहिजेत. त्या मार्गावरूनच त्यांना फिरण्याची परवानगी असली पाहिजे, असे मुंबईतील पर्यटक सूर्यकांत गांगुर्डे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यातील अनेक व्यवसायिक हे अनधिकृ त व्यवसाय करत असल्याची माहिती प्राप्त झाली असून यावर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.
मनोरंजनाच्या साधनांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातील किती जणांना परवाना देण्यात आला आहे. हा खरा संशोधनाचा विषय आहे. त्यांनी खुशाल व्यवसाय करावा. मात्र, समुद्रातून जाणाºया स्पीड बोटी, जेटस्की या बोटींमुळे मासेमारी करणारी जाळी तुटत असल्याने छोट्या मच्छीमारांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. त्यांना ठरावीक चॅनेलमधून जाण्यास सांगितल्यास सर्वांनाच व्यवसाय करता येणार आहे. एटीव्हीमुळे समुद्रकिनारी सर्वसामान्यांनाही फिरणे मुश्कील झाले आहे. त्यामध्ये अपघात झाल्यास कोण जबाबदार राहणार आहे. त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी.
- प्रकाश भगत, मत्स्य व्यावसायिक
समुद्रकिनारी नौकानयन अंतर्गत १९ परवाने देण्यात आले आहेत. त्यामुळे अन्य विनापरवाना काही बोटी सुरू असल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच समुद्रकिनारी तब्बल २३ एटीव्ही या अनधिकृत व्यवसाय करत आहेत. यापूर्वी त्यांना देण्यात येणारे परवाने हे मेरीटाइम बोर्डाकडून देण्यात येत होते. मात्र, आता त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत परवाने देण्यात येतात, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन आणि पोलीस यांची आहे.
- अतुल धोतरे, बंदर निरीक्षक, मेरीटाइम बोर्ड
पर्यटकांच्या मनोरंजनासाठी समुद्रकिनारी विविध प्रकारच्या स्पीड बोटी, जेटस्की, एटीव्ही, पॅराग्लायडिंगची सोय करण्यात आली आहे. मात्र, त्यातील बहुतांश व्यवसाय बेकायदेशीर आहेत. एका परवान्यावर चार-चार बोटी चालवण्यात येत आहेत. ठरावीक चॅनेल त्यांना दिले असतानाही ते समुद्रात अन्य ठिकाणीही फिरत असल्याने आमच्या लहान मच्छीमारांची जाळी तुटत आहेत. सरकार, प्रशासनाने यावर तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे.
- मदन सारंग,
मत्स्य व्यावसायिक
परवानगीपेक्षा बोटी अधिक
1अलिबागच्या समुद्रकिनारी मोठ्या संख्येने स्पीड बोटी, बनाना राइड, जेटस्की अशा स्वरूपाच्या मनोरंजनांच्या साधनांनासाठी १९ परवाने देण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात या ठिकाणी परवानगी देण्यात आलेल्या संख्येपेक्षा अधिक बोटी व्यवसाय करत आहेत.
2त्यामुळे मच्छीमारांच्या जाळी तुटून नुकसान होत असल्याचे निवेदन येथील मासेमारी करणाºया व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी, मेरीटाइम बोर्ड, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले आहे.
3अनधिकृत सुरू असलेल्या व्यवसायातून एखादा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल मच्छीमार तसेच स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.