अलिबाग : शहरातील मुख्य रस्त्यांवर सध्या अनधिकृत वाहने उभी केली जात असल्यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या रस्त्यांवर गाड्या पार्क केल्यामुळे रस्ते आखूड होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी वाहन चालवायची तरी कशी, असा प्रश्न उभा राहत आहे. त्यातच सध्या दिवाळीच्या खरेदीला जोमाने सुरुवात झाल्याने, बाजारपेठेत येणाऱ्या खरेदीदारांच्या रस्त्यात उभ्या असलेल्या गाड्यांमुळे वाहतुकीच्या प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे.
शहरातील नगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले. या रुंदीकरणाकरिता नागरिकांनी नव्या इमारती बांधताना, नव्या शहर विकास आराखड्यानुसार रस्ता रुंदीकरणाकरिता जागाही दिली, परंतु या रस्त्यांवर चारचाकी वाहने पार्किंग करून ठेवलेली असतात. परिणामी, रस्ता रुंदीकरण करूनही ४० टक्के रस्ता कायमस्वरूपी पार्किंग केलेल्या चारचाकी वाहनांमुळे अडून राहितो.
वाहतूककोंडी, बेदरकार पार्किंग ही एक सामाजिक समस्या बनली आहे, परंतु यावर उपाय केवळ पोलीस आणि कायदा हा असू शकत नाही. वाहन मालकांची स्वयंशिस्त यातूनच ही समस्या सुटू शकते आणि त्याकरिता नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याची अपेक्षा वाहतूक विभागाकडून व्यक्त केली आहे.