मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग शुन्य किमीवर अनधिकृत प्रवासी वाहतूक
By वैभव गायकर | Published: September 6, 2023 04:47 PM2023-09-06T16:47:45+5:302023-09-06T16:48:04+5:30
सायन पनवेल महामार्गावरील कळंबोली याठिकाणाहून द्रुतगती महामार्गाला सुरुवात होते. पुणे तसेच पुढे घाटमाथ्यावर जाणाऱ्या प्रवाशांची याठिकाणी मोठी गर्दी असते.
पनवेल:मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाची ज्या ठिकाणाहून सुरुवात होते.अशा कळंबोली येथील शुन्य किमीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत प्रवासी वाहतुकीमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.बंदी असताना प्रवासी याठिकाणी उभे राहत असल्याने जमलेली गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी कळंबोली वाहतुक पोलिसांची देखील चांगलीच दमछाक होत आहे.
सायन पनवेल महामार्गावरील कळंबोली याठिकाणाहून द्रुतगती महामार्गाला सुरुवात होते. पुणे तसेच पुढे घाटमाथ्यावर जाणाऱ्या प्रवाशांची याठिकाणी मोठी गर्दी असते. द्रुतगती महामार्गावरून प्रवास करण्यापूर्वी प्रवासी गाड्या कळंबोली याठिकाणी द्रुतगती महामार्गाच्या अलीकडे थांबत असतात.कळंबोली मॅकडोनाल्ड स्टॉप हे याकरिता अधिकृत थांबा नेमला असताना पुढे काही प्रवासी शून्य किमीवर थांबत असतात.हे प्रवासी पाहुन काही वाहन चालक आपल्या गाड्या थेट नो पार्किंग मध्येच म्हणजे द्रुतगती महामार्गाच्या प्रवेशिकेवर उभ्या करतात.बंदी असताना अनेक वाहने याठिकाणी थांबत असल्याने जोरदार वेगाने येणाऱ्या इतर वाहनांना या वाहनांचा अडथळा निर्माण होतो.अनेक वेळा किरकोळ अपघात देखील याठिकाणी घडत असताना प्रवासी सर्रास याच जागेवर उभे राहत आहेत.भविष्यात याठिकाणी अपघाताची मोठी घटना घडू नये म्हणुन वाहतुक पोलिसांनी याकरिता मोहीम अधिक तीव्र करण्याची गरज आहे
दंड वसुल करणार कोण?
बंदी असलेल्या याठिकाणावर गाडी उभी करणे तसेच प्रवासी थांबल्यास 5 हजारांचा दंड वसूल करण्यात येईल अशा स्वरुपाचा फलक याठिकाणी वाहतुक पोलिसांच्या नावाने कित्येक वर्षापासून लावण्यात आला आहे.मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसुन येत नाही.हा दंड वसूल कोण करणार ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
याठिकाणी थांबणाऱ्या वाहन चालकांवर आम्ही दररोज दंडात्मक कारवाई करीत आहोत.याकरिता दोन कर्मचारी देखील आम्ही नेमलेले आहेत.प्रवाशांवर कारवाई करण्याचा अधिकार वाहतुक पोलिसांना नाही.प्रवाशांनी याठिकाणावर थांबू नये असे अवाहन आम्ही वेळोवेळी करीत असतो.
-हरिभाऊ बानकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक,खारघर वाहतुक शाखा )