भूमिगत केबल प्रकल्प म्हणजे नागरिकांच्या डोक्याला ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 12:37 AM2021-03-13T00:37:48+5:302021-03-13T00:38:08+5:30
ठेकेदार कंपनीबाबत महावितरणचे कानावर हात
लोकमत न्यूज नेटवर्क
रायगड : शहरातील भूमिगत केबलचा प्रकल्प आता अलिबागकरांच्या डोक्याला ताप ठरला आहे. कामाचा निकृष्ट दर्जा, महावितरणच्या अधिकाऱ्यांचे सुपरविजन करण्याच्या कामाकडे दुर्लक्ष, अनेकांच्या घराजवळ खणून ठेवलेले खड्डे यामुळे या प्रकल्पाच्या कामामुळे नागरिक चांगलेच वैतागले असल्याचे चित्र आहे. या प्रकरणी महावितरणने मात्र कानावर हात ठेवल्याने नागरिकांमध्ये कमालीचा असंताेष खदखदत आहे.
राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती धोके व निवारण योजनेअंतर्गत अलिबागमध्ये भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याच्या कामाला अलिबागमध्ये सुरुवात झाली आहे. सुमारे ९० काेटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. साेसाट्याचा वारा, वादळ, मुसळधार पाऊस या कालावधीत विद्युत तारा, खांब पडण्याचे प्रमाण लक्षणीय असते, तसेच वीजपुरवठाही सातत्याने खंडित हाेऊन नागरिक कमालीचे त्रस्त असतात.
यावर उपाययाेजना म्हणून अलिबाग शहरात भूमिगत केबल टाकण्याच्या कामाला गेल्या काही महिन्यांपासून सुरुवात झाली आहे. भूमिगत केबलचे काम अरुंद गल्ली वगैरे वगळता रस्त्याची खोदाई करताना विशिष्ट मशीन्सद्वारे ट्रचिंग व ट्रच लेस जमिनीत आडवे ड्रीलिंग करून (केबल लाइंग एचडीडी मेथड) करणे करारनाम्यातील अटीनुसार आवश्यक आहे. मात्र लीना पॉवरटेक या कंत्राटदार कंपनीने अलिबाग शहरामध्ये तसेच चेंढरे, वरसोली या ग्रामपंचायत हद्दीमध्ये जेसीबी लावून खोदकाम करून काम केल्याने रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.
गेल्या महिन्यामध्ये तर श्रीबाग परिसरातील रस्ते खाेदून ठेवल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे फारच मुश्कील झाले हाेते. कंपनीने ज्या-ज्या ठिकाणी अशी कामे केली आहेत. तेथील रस्त्यांची फारच दुरवस्था झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. अलिबाग येथील आरटीआय कार्यकर्ते संजय सावंत यांनी केलेल्या तक्रारीची दखल जिल्हाधिकारी रायगड यांनी घेतली हाेती. जानेवारीमध्ये महावितरणचे पेण येथील अधीक्षक अभियंता यांना याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश प्राप्त होताच अधीक्षक अभियंता यांनी तातडीने महावितरणचे अलिबाग विभागाचे कार्यकारी अभियंता यांना महावितरणच्या नियमाप्रमाणे त्वरित कार्यवाही करून अहवाल सादर करण्यास फर्माविले होते. परंतु
आता मार्च महिना उजाडला तरीही याबाबत काहीच स्पष्ट झाले नसल्याचे दिसून येते.
१० मार्च २०१८ रोजी जिल्हाधिकारी रायगड यांच्या कार्यालयात या प्रकल्पाची माहिती देण्यासाठी झालेल्या चर्चासत्रातही राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सी.आर. मिश्रा यांनी भूमिगत विद्युत केबल टाकण्यासाठी मशीन्सद्वारे ट्रचिंग व ट्रच लेस जमिनीत आडवे ड्रीलिंग करणे (केबल लाइंग एचडीडी मेथड) या पद्धतीचा वापर करण्यात येईल, अशी माहिती दिल्यानंतरच अलिबाग नगर परिषद, चेंढरे व वरसोली ग्रामपंचायत यांनी या प्रकल्पास सहमती दर्शविली होती.
विशेष म्हणजे या प्रकल्पाच्या कामावर देखरेख करण्याची जबाबदारी असणाऱ्या महावितरणने कानावर हात ठेवले आहेत. कामावर काय देखरेख ठेवली, कंपनीसोबत कोणता करारनामा झाला, कंपनीवर विलंबाबाबत काय कारवाई केली याबाबत सावंत यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये अर्ज केला असता अलिबाग महावितरणने चक्क याबाबत माहिती त्यांच्याकडे उपलब्ध नाही, असे लेखी उत्तर दिले असल्याने सावंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शहरातील रस्त्यांच्या विद्रूपीकरणाबाबत संबंधित कंपनीला जाब विचारण्यात येईल. शहरात खाेदलेले रस्ते अलिबाग नगरपालिका करणार आहे. राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सी.आर. मिश्रा यांच्याकडून अधिक माहिती घ्या.
- कुंदन भिसे, अभियंता, महावितरण