सायन पनवेल महामार्गावरील भुयारी मार्ग बनले डास उत्पत्तीचे केंद्र
By वैभव गायकर | Published: September 12, 2023 06:20 PM2023-09-12T18:20:53+5:302023-09-12T18:21:07+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाने सायन-पनवेल महामार्गावर उभारलेले जवळपास सर्वच भुयारी मार्ग वापराविना आहेत.
पनवेल: सार्वजनिक बांधकाम विभागाने सायन-पनवेल महामार्गावर उभारलेले जवळपास सर्वच भुयारी मार्ग वापराविना आहेत. करोडो रुपयांचा खर्च करून हे भुयारी मार्ग सध्या डास उत्पत्तीचे केंद्र बनत आहे.मागील वर्षाभरापासून याठिकाणी साचलेल्या पाण्यामध्ये मच्छरांची पैदास होत आहे.यामुळे या भुयारी मार्गालगत बस स्थानक,रिक्षा स्टॅन्ड जवळ थांबलेले प्रवासी विविध आजारांच्या विळख्यात येण्याची शक्यता आहे.
खारघर, कामोठे,कळंबोली येथील भुयारी मार्गाचा वापर शून्य असून प्रशासनाने देखील ते बंदिस्त करण्याऐवजी उघडे ठेवल्याने रोगराई देखील पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.खारघर मधील जागरूक नागरिक संजय पाटील यांनी याबाबत संताप व्यक्त करीत प्रशासनाने या डास उत्पत्तीच्या केंद्रावर लगाम लावावा अशी मागणी केली आहे.पनवेल परिसरात डेंग्यु झपाट्याने वाढत आहे.पालिका प्रशासन डेंग्यूची साथ नियंत्रणात आणण्यास प्रयत्न करत असताना एकीकडे नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेल्या ठिकाणी सर्रास पाणी मोठ्या प्रमाणात साचत असेल तर त्याला जबाबदार कोण? खारघर,कामोठे आणि कळंबोली या तुम्ही भुयारी मार्गाजवळ सर्वसामान्य नागरिक, प्रवासी आणि पोलिसांची वर्दळ असते.त्यामुळे या सर्वांचेच आरोग्य धोक्यात आले आहे.या भुयारी मार्गातील साचलेले पाणी बाहेर काढून त्याठिकाणी औषध फवारणी करण्याचीमागणी सामाजिक कर्ताकर्ते महादेव वाघमारे यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे .