मच्छीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण; पेण प्रांत कार्यालयासमोर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 11:29 PM2020-01-13T23:29:30+5:302020-01-13T23:29:36+5:30
पुरातील नुकसान भरपाईची मागणी
पेण : तालुक्यातील वाशी, वडखळ, मसद, शिर्की, सोनखार, उणोर्ली विभागातील मत्स्य तलावधारक शेतकरी मच्छ तलावांचे २०१९ ऑगस्ट -सप्टेंबर महिन्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती, यामुळे झालेली नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी सोमवार १३ जानेवारी सकाळी १० वाजल्यापासून प्रांत कार्यालयात बेमुदत उपोषणाला बसले आहेत.
पेण तालुका मुलभूत अधिकार संघर्ष समितीची या सर्व शेतकरी बांधवांनी स्थापना केली असून या समितीच्या झेंड्याखाली ठिय्या आंदोलन सुरू झाले आहे. तब्बल ५०ते ६० शेतकरी व त्यांच्या समर्थनार्थ बहुसंख्य शेतकरी बांधवही प्रांतकार्यालय प्रांगणात उपोषणास बसले आहेत. या नवीन वर्षात मत्स्य शेतकºयांचे हे पहिलेच आंदोलन असून हे आंदोलन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी म्हणूनच हाती घेण्यात आले आहे. गतवर्षात आॅगस्ट, सप्टेंबर २०१९ च्या महापुरात मच्छ तलावांचे पुरामुळे प्रंचड नुकसान झाले आहे. पेण तालुक्यातील एकूण १०७ गावांतील २०१७ तलावांचे एकूण १८७६ मत्स्य तलावधारक लाभार्थी शेतकºयांचे अंदाजे २३०.४४ हेक्टर क्षेत्रावरील मत्स्य तलावांचे, पुरामुळे विविध प्रकारचे नुकसान झाले आहे. यापूर्वी देखील अनेक वेळा नैसर्गिक आपत्तीमुळे मत्स्य तलावधारकांचे नुकसान झाले होते, परंतु शेतकरी संघटीत नसल्याने कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई यापूर्वी मिळालेली नाही. ही बाब लक्षांत घेऊन शासनातर्फे नुकसान भरपाई मिळवण्यासोबतच सर्व मत्स्य तलावधारकांना संघटीत करण्याचा या मागचा उद्देश आहे.
शेती व्यवसाया बरोबरीने मच्छ तलावांतील मासे पालन हा येथील बहुतांश शेतकरी बांधवांचा व्यवसाय आहे. गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे दोन वेळा पुरसदृश परिस्थिती निर्माण होऊन तलाव ओव्हरफ्लो झाले आणि पुराचे पाण्यासोबत मासेही पळाले. आता या आंदोलनाची दखल घेत शासकीय स्तरावर या मच्छ तलावांचे आर्थीक नुकसानीबाबत जोपर्यंत शासनाकडून उत्तर मिळत नाही तोपर्यंत शेतकºयांनी बेमुदत उपोषणाचा निर्धार केला आहे.
प्रांताधिकाºयांनी घेतली दखल
प्रांत अधिकारी प्रतिमा पुदळवाड यांनी या आंदोलनाची दखल घेत, ज्या दिवशी संघटनेचे निवेदन मिळाले, त्याच दिवशी मच्छ आयुक्त कार्यालय अलिबाग यांच्याशी निगडित हा विषय असून, या शेतकरी बांधवांशी त्यांच्या मागण्या बाबतीत लक्ष घालू. वरिष्ठ पातळीवर आर्थिक नुकसानीचा अहवाल पाठविण्यसाठी प्रस्ताव सादर करण्याबाबत मच्छ आयुक्त कार्यालयास पत्रव्यवहार करण्यात आला आहे, असे प्रांतकार्यालयाचे नायब तहसीलदार वाघमारे यांनी सांगितले. तर ज्या मच्छ विभागाशी हा संबंधित विषय येतो, त्या अलिबाग कार्यालयातील अधिकारी वर्गाला तातडीने पाचारण करण्यात आले असल्याचेही वाघमारे यांनी सांगितले.