मधुकर ठाकूर,उरण :उरण एसटी डेपोमध्ये रिकामी बस मागे घेताना असताना रोजंदारीवर सफाईचे काम करणाऱ्या महिलेचा दुदैवाने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (२७) घडली.या घटनेची माहिती मिळताच संतप्त झालेल्या नातेवाईकांनी बसेस डेपोमध्येच अडवून विविध मागण्यांसाठी दोन तास रास्ता रोको केले. यामुळे मात्र प्रवासी वाहतूकच ठप्प झाल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली.
उरण एसटी डेपोमध्ये बसेसची साफसफाई करण्यासाठी रोजंदारीवर महिला काम करीत आहेत. मंगळवारी सकाळच्या सत्रात उरण डेपोतील कार्यशाळेत एसटी मागे घेत असताना वाहन चालकाच्या निष्काळजीमुळे अपघात घडला.या अपघातात रोजंदारीवर साफसफाईचे काम करणाऱ्या कालिदा भीमराव शरणागत (५२) रा.डाऊरनगर-उरण या महिलेचा दुदैवाने मृत्यू झाला.महिलेच्या अपघाताची माहिती मिळताच संतप्त झालेल्या नातेवाईकांनी उरण डेपोतच प्रवासी बसेस थांबवून रास्ता रोको आंदोलन केले.या रास्तारोको आंदोलनामुळे १२ ते २ दरम्यान डेपोमधील प्रवासी वाहतूक ठप्प झाली होती.याआधीच नवीमुंबई परिवहन सेवेने उरण परिसरातील प्रवासी वाहतूक बंद केली आहे.त्यातच रास्तारोकोमुळे एसटीची प्रवासी वाहतूकही बंद करण्यात आल्याने प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.
दरम्यान मृत महिलेच्या नातेवाईकांनी मृताच्या नातेवाईकांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी, कुटुंबातील एकाला नोकरीत सामावून घेण्यात यावे यासाठी रास्ता रोको आंदोलन केले.मागण्याची पुर्तता होईपर्यंत डेपोतुन प्रवासी वाहतूक सुरू करण्यास जोरदार विरोध दर्शविला.अखेर मुंबई -पुणे प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी श्रीनिवास जोशी,मुंबई विभागीय नियंत्रक गुलाब बच्छाव , पोलिस निरीक्षक सुर्यवंशी कांबळे, रवींद्र भोईर,मृत महिलेचे नातेवाईक यांच्यात चर्चा झाली.तासभर झालेल्या चर्चेनंतर मृत महिलेच्या नातेवाईकांना तातडीची मदत म्हणून दहा हजार रुपये व १० लाखांची आर्थिक नुकसान भरपाई देण्यावर सर्वांचेच एकमत झाले.त्यानंतरच दोन तासांनी डेपोतुन प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली असल्याची माहिती उरण एसटी डेपो व्यवस्थापक सतीश मालचे यांनी दिली.