दुर्दैवी! पाच किलोमीटरपर्यंत मृतदेह नेला डोलीतून; रस्त्याअभावी चिंभावेवासीयांची फरफट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 01:31 PM2024-08-12T13:31:51+5:302024-08-12T13:32:17+5:30
भर पावसात रात्रीच्या वेळी मृतदेह डोलीत ठेवून घरी नेण्याची नामुष्की माने कुटुंबीयांवर आली
लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: वाडीत जाणारा रस्ताच नसल्याने एकाचा मृतदेह चक्क पाच किलोमीटरपर्यंत डोलीतून न्यावा लागल्याचा प्रकार चिंभावे धनगरवाडीत समोर आला आहे. या घटनेमुळे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. धनगरवाडीतील दीपेश माने याचा ठाण्यातील मानपाडा येथे ९ ऑगस्टला मृत्यू झाला. रुग्णवाहिकेतून त्याचा मृतदेह चिंभावे गावी आणला. मात्र धनगरवाडीतील त्याच्या घरापर्यंत जाणारा रस्ताच शिल्लक राहिलेला नसल्याने रुग्णवाहिका वाडीच्या वेशीवरच थांबवण्यात आली आणि त्यानंतर भर पावसात रात्रीच्या वेळी मृतदेह डोलीत ठेवून घरी नेण्याची नामुष्की माने कुटुंबीयांवर आली.
पावसामुळे हा सगळा रस्ता चिखलमय झालेला असल्याने पाच किलोमीटरपर्यंत वाहनांची ये-जा अशक्य होते. त्यामुळे वाडीत कोणालाही डॉक्टरकडे ने-आण करण्यासाठी डोलीतूनच न्यावे लागते. या परिस्थितीत रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच अनेकांचे प्राण गेल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.
निधी झाला मंजूर,पण रस्ता कधी?
यापूर्वी महाडचे माजी आमदार शांताराम फिलसे यांच्या काळात वाडीपर्यंत जाणारा रस्ता बांधण्यात आला होता. आता आमदार भरत गोगावले यांनी या रस्त्यासाठी निधी मंजूर केला. पण पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून मंजुरी मिळूनही या रस्त्याचे काम अद्याप सुरूच झालेले नाही. त्यामुळे निधी मंजूर असून रस्ता का होत नाही, असा सवाल धनगरवाडीवासीयांकडून उपस्थित केला आहे.
निवडणुका तोंडावर आल्या की रस्त्याची तात्पुरती मलमपट्टी केली जाते. निवडून आल्यावर रस्ता पक्का करून देतो, असे आश्वासन दिले जाते. परंतु नंतर सर्व जण दुर्लक्ष करतात. स्वतंत्र भारताचा धनगरवाडीही एक भाग आहे, हे लक्षात घेऊन सरकारने रस्ता व इतर सुविधा देऊन आम्हालाही विकासाच्या प्रवाहात आणावे.
- नामदेव ढेबे, ग्रामस्थ, धनगरवाडी-चिंभावे