महामार्गाच्या भूमिगत कामामुळे विनाअडथळा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 11:28 PM2021-02-27T23:28:26+5:302021-02-27T23:28:53+5:30
पोलादपूरजवळील मुंबई-गोवा महामार्ग एनएच- ६६ : तळ कोकणात जाणारी वाहने थेट खालून जाणार
लोकमत न्यूज नेटवर्क
पोलादपूर : अनेक वर्षे रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग एनएच- ६६ जुना- १७ या मार्गाच्या चौपदरीकरणाचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. २०२२ पर्यंत संपूर्ण मार्गाचे काम पूर्णत्वास जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यानुसार पोलादपूर शहरालगत भूमिगत कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे.
मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू असल्याने तीन जिल्ह्यांच्या टोकावर वसलेल्या पोलादपूरचे स्वरूप बदलत आहे. शहरातील भूमिगत मार्गिकांमुळे भविष्यात विनाअडथळा प्रवास करणे शक्य होणार आहे. या महामार्गाचे काम सध्या कशेडी ते इंदापूरपर्यंत वेगाने सुरू आहे. या मार्गामुळे तळ कोकणात जाणारी वाहने थेट खालून जाणार असल्यामुळे शहराचा चेहरामोहराच बदलणार आहे.
चौपदरीकरणामुळे कोकणात जाण्यासाठी बॉक्स कंटिंग, तर महाबळेश्वरकडे जाण्यासाठी उड्डाणपूल होणार आहे, याचे काम जलद गतीने सुरू आहे. सद्य:स्थितीत पोलादपूर स्थानक परिसर हा तीन जिल्ह्यांना जोडणारा असल्याने अनेक बस, खाजगी गाड्या, लहान- मोठी वाहने याठिकाणी थांबतात. मात्र, भविष्यात महामार्गाचे काम पूर्ण झाल्यावर हे चित्र दिसणार नाही.
महामार्गाच्या भूमिगत कामासाठी अद्ययावत यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. महाड- पोलादपूरमार्ग पोलादपूर हद्दीतील पार्ले गावापासून सुरू होतो. याठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. पुढे शेलार ढाबा ते बालाजी हॉटेल येथे उड्डाणपूल करण्यात येत आहे, तसेच काळभैरव देवस्थानपासून सडवली पुलापर्यंत भूमिगत मार्गिका करण्यात येत आहे.
सद्य:स्थितीत सडवली पुलाकडून भूमिगत मार्गिकेचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. अंदाजे ३० फूट खाली व चार पदरी मार्गिका तयार करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यात जाण्यासाठी व पोलादपूर बसस्थानकापर्यंत येण्यासाठी या ठिकाणी एक उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. पोलादपूर बसस्थानकालगत आत व बाहेरील प्रवेश द्वाराजवळ दोन पूल बांधण्यात येणार आहेत. याठिकाणी शिरवळचा पॅटर्न राबविण्यात येणार असल्याचे चित्र दिसते.
स्थानिक व्यावसायिकांवर होणार परिणाम
पोलादपूर बसस्थानक परिसरात मुंबई, कोकण, महाबळेश्वरकडे जाणाऱ्या प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे या परिसरात दुतर्फा छोटे-मोठे व्यावसायिक उदरनिर्वाह करत होते. मात्र, चौपदरीकरणाच्या कामामुळे हा परिसर पूर्ण उजाड झाल्याने, शेकडो व्यावसायिकांना त्याचा व्यवसाय गुंडाळावा लागला होता. सध्या काही व्यावसायिकांनी महामार्गावर नव्याने बांधलेल्या भूमिगत गटारीवर आपले बस्तान मांडले असले तरी भविष्यात स्थानिक व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहावर त्याचा परिणाम होणार आहे.