केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 02:29 AM2019-03-29T02:29:17+5:302019-03-29T02:29:49+5:30
रायगड लोकसभा मतदार संघाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी गुरुवारी आपले दोन उमेदवारी अर्ज दाखल केले.
अलिबाग : रायगड लोकसभा मतदार संघाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी गुरुवारी आपले दोन उमेदवारी अर्ज दाखल केले.
उमेदवारी अर्ज सादर करताना गीते यांनी सादर केलेल्या शपथपत्रात त्यांनी आपली एकूण संपत्ती सात कोटी १९ लाख १० हजार ३७८ रुपये असल्याचे जाहीर केले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी शपथपत्रात दाखल केलेल्या एकूण संपत्तीपेक्षा या वेळच्या संपत्तीत दोन कोटी ७४ लाख ४३ हजार ८९१ रुपयांनी वृद्धी झाल्याचे दिसून आले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी जाहीर केलेली एकूण संपत्ती चार कोटी ४४ लाख ६६ हजार ४८७ होती. त्यामध्ये एक कोटी ४६ लाख ७२ हजार ६४७ रुपयांचे दागदागिने व बँकेतील व रोख रक्कम होती, तर दोन कोटी ९७ लाख ९३ हजार ८४० रुपये किमतीची स्थावर मालमत्ता होती.
यंदा दाखल केलेल्या शपथपत्रानुसार जाहीर केलेली एकूण संपत्ती सात कोटी १९ लाख १० हजार ३७८ रुपये असून, त्यामध्ये एक कोटी ७४ लाख ८८ हजार २६९ रुपयांचे दागदागिने व बँकेतील व रोख रक्कम आहे, तर दोन कोटी ९७ लाख ९३ हजार ८४० रुपये किमतीची स्थावर मालमत्ता आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी शिवसेनेचे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री रामदास कदम, भाजपाचे रायगड जिल्हाध्यक्ष व सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर हे त्यांच्यासोबत उपस्थित होते.