रायगड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी सोमवारी अलिबाग येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात हजेरी लावण्याचे आदेश केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना न्यायालयाने दिले होते. मात्र प्रकृती ठीक नसल्याचे कारण सांगत राणेंनी चौकशीला गैरहजर राहत थेट दिल्ली गाठली आहे.
प्रकृती ठीक नसल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे हजेरी लावता येणार नाही, असा अर्ज राणे यांचे वकील ॲड. सचिन चिकणे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख दयानंद गावडे यांच्याकडे सादर केला आहे. हा अर्ज संबंधित तपास अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येऊन कायदेशीर मार्गदर्शन घेण्यात येणार असल्याची माहिती गावडे यांनी दिली.
जनआशीर्वाद यात्रेदरम्यान महाड येथे राणे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर राणे यांच्याविरोधात महाड, नाशिक, औरंगाबाद, पुणेसह विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. राणे यांना अटक झाल्यानंतर त्यांना महाड येथील न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र, जामीन मंजूर करताना अलिबाग येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजेरी लावावी, अशी अट न्यायालयाने घातली होती. सोमवारी दहा अधिकाऱ्यांसह सुमारे १०० पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावला होता.
राणे दिल्लीला रवाना
मंत्री नारायण राणे यांची कोकणातील जनआशीर्वाद यात्रेची सांगता रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला येथे झाली. त्यामुळे सोमवारी सकाळी राणे हे कणकवली येथून गोवा येथे रवाना झाले. तेथून विमानाने ते दिल्लीला गेले.