मधुकर ठाकूर, उरण : चाबहार बंदराद्वारे मध्य आशियाशी देशांशी व्यापाराच्या संधींमध्ये वाढ होणार आहे. किफायतशीर व जलद मालवाहतूकीसाठी चाबहार मार्गे आयएनएसटीसी मार्गाचा सुयोग्य वापर केल्याने व्यापाराची संधी वाढ़ू शकतात असे प्रतिपादन केंद्रीय बंदरे, जहाजवाहतुक व जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी रविवारी मुंबईत साजरा करण्यात आलेल्या ‘चाबहार" दिवस निमित्ताने केले.
केंद्रीय मंत्री सोनोवाल यांनी चाबहार दिनानिमित्त मुंबईत मध्य आशियाई देशांच्या उच्चस्तरीय राजनैतिक शिष्टमंडळाशी रविवारी मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये संवाद साधला. आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉर (INSTC) जो भारत आणि मध्य आशिया देशांदरम्यान दरम्यान मालवाहतूक किफ़ायतशिर करण्यासाठी भारताचे महत्वपूर्ण विजन आहे याची सुरुवात म्हणून हा दिवस साजरा केला जातो. इराणमधील चाबहार बंदर हे या प्रदेशाचे आणि विशेषतः मध्य आशियाचे एक महत्वाचे व्यापारी संक्रमण केंद्र आहे.
केंद्रीय मंत्री सोनोवाला यांच्यासमवेत या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, कजाकिस्तान गणराज्याचे राजदूत नूरलान झालगासबायेव, किर्गिस्तानचे राजदूत असीन इसेव, ताजिकिस्तानचे राजदूत लुकमोन बोबोकलोंजोडा, तुर्कमेनिस्तानचे राजदूत शालर गेल्डिनाजारोव अमासडोर, उजबेकिस्तानचे राजदूत दिलशोद अखातोव, बंदरे व आर्थिक विषयांचे उपमंत्री (पीएमओ) जलील एस्लामी, अफगाणिस्तानच्या महावाणिज्यदूत (सीजी) जकिया वर्दाक, इस्लामिक गणराज्य ईरानचे महावाणिज्यदूत ए. एम. अलीखानी, ईरानचे मंत्री व सडक व शहर विकास मंत्रालयाच्या आंतरराष्ट्रीय संबंध केंद्रप्रमुख यांचे सल्लागार मसूद ओस्ताद हुसैन, इंडियन पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजीव जलोटा, जे. पी. सिंह, जे. एस. पै, आईपीजीएलचे एमडी सुनील मुकुंदन आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या प्रसंगी केंद्रीय बंदरे, जहाजवाहतुक व जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी इराणमधील चाबहार बंदराच्या माध्यमातून मध्य आशियाई देशांसोबत व्यापार संधी खुल्या करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. "भारत मध्य आशियाई देशांसोबत पर्यायी योजना विकसित करण्याच्या दिशेने काम करत आहे, ज्यामध्ये दोन्ही क्षेत्रांच्या मजबूत संबंधांवर विश्वास ठेवणारी प्रचंड व्यापार क्षमता आहे. या योजनेचा मध्य आशियाई देशांसोबत भारतास लाभ होणार आहे. इराणमधील चाबहार येथील शाहीद बेहेश्ती बंदराद्वारे आयएनएसटीसीची कल्पना ही एक मल्टी मॉडेल लॉजिस्टिक कॉरिडॉर तयार करून दोन बाजारपेठांना जोडण्याची कल्पना आहे. यामुळे लॉजिस्टिक खर्च किफायतशीर होण्यासोबतच दोन प्रदेशांमधील व्यापारात वाढ होण्यास मदत होईल", असे ते म्हणाले.
"चाबहार मुक्त व्यापार क्षेत्र ही लॉजिस्टिक कंपन्यांसाठी व्यापार वाढीसाठी एक संधी आहे. व्यापारासाठी हा मार्ग खुला झाल्यानंतर लॉजिस्टिक खर्च, पैसा आणि वेळे तर्कसंगत बनेल आणि दोन प्रदेशांदरम्यान किफायतशीर, वेगवान आणि कमी अंतराचा सागरी मार्ग तयार होईल. हा मार्ग खुला झाल्यानंतर निर्माण व्यापार संधी आणि संभाव्यतेबद्दल आपण आपल्या व्यावसायिक समुदायास माहिती द्यावी”, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमादरम्यान, मध्य आशियाई देशांतील प्रतिनिधींनी आयएनएसटीसी सोबतच चाबहार लिंक त्या क्षेत्रात आयात-निर्यात व्यापारास चालना देण्यासाठी आणि भूपरिवेष्टित देशांमधील विकासाला आणखी चालना देण्यासाठी कशाप्रकारे महत्त्वाची भूमिका बजावू शकते यावरही सोनोवाल यांनी प्रकाश टाकला. दिवसभर चाललेल्या कार्यक्रमादरम्यान, अनेक सादरीकरणे आणि व्यवसायिक सत्रे पार पडली. इंडियन पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष, आयपीजीएलचे एमडी, एफएफएफएआय आणि सहसचिव, परराष्ट्र मंत्रालय, भारत सरकार यांनी सादरीकरणे आणि भाषणे दिली. कार्यक्रमाच्या शेवटी आयपीजीएल संचालक (ऑपरेशन्स) उन्मेष शरद वाघ यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली.