सृजन प्राथमिक शाळेत अनोखा मातृदिन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2018 03:13 AM2018-09-09T03:13:59+5:302018-09-09T03:14:07+5:30
श्रावण अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या! याच दिवशी मातृदिन असतो.
- जयंत धुळप
अलिबाग : श्रावण अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या! याच दिवशी मातृदिन असतो. मुलांचं संगोपन आणि संस्कार नेहमीच आई करत असते. आपले अवघे आयुष्य मुलांच्या सौख्यासाठी वेचणाऱ्या आईप्रति कृतज्ञता म्हणून मातृदिन साजरा केला जातो. या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व शालेय जीवनातच बालगोपाळ विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याकरिता एका आगळ््या मातृदिनाचे आयोजन शनिवारी सृजन पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक विद्यालयात करण्यात आले होते.
बालगोपाळ विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून रंगवलेली शुभेच्छापत्रे आपल्या आईचे शाळेत पूजन करुन तिला भेट म्हणून दिले आणि त्या माउलींना आपल्याच पाल्याचे कौतुक करण्याकरिता शब्दच अपुरे पडले होते. शाळेच्या प्रयोगशील मुख्याध्यापिका सुजाता पाटील यांच्या कल्पकतेतून शाळेच्या सर्व शिक्षकवृंदाने आयोजित केलेल्या या अनोख्या मातृदिनास विद्यार्थ्यांच्या माता मोठ्या संख्येने आणि आगळ््या उत्साहात उपस्थित राहिल्या होत्या.
या शाळेत बहुभाषिक विद्यार्थी असल्याने देशातील विविध राज्यातील माता यानिमित्ताने शाळेत एकत्र आल्या होत्या. त्याच्यातही या अनोख्या उपक्रमाच्या निमित्ताने संवाद झाला. आपापल्या आईला शुभेच्छापत्र दिल्यावर तिच्या चेहºयावरील आनंद पहाताना हे सारे चिमुकले देखील सुखावून गेले होते. आई आणि मुलगा वा मुलगी यांच्यातील अनोखा स्नेहभाव पहाताना शाळेचा शिक्षकवृंद देखील आनंदित होवून गेला होता.
आपल्या आईला शुभेच्छापत्रात काय आवडेल याचा विचार करुन या बालगोपाळांनी तयार केलेल्या शुभेच्छा पत्रातून बालभावनांच्या विविध कल्पनाविष्कारांचे दर्शन या निमित्ताने घडून आले.