चुकीच्या प्रवृत्तींना विरोध करण्यासाठी एकत्र या; राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 05:44 AM2023-10-28T05:44:14+5:302023-10-28T05:46:31+5:30
महाराष्ट्र देशाला दिशा देणारा राज्य असून महाराष्ट्रच देशाचे नेतृत्व करेल, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग /श्रीवर्धन : देशातील चुकीच्या प्रवृत्तींना विरोध करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे आवाहन करत महाराष्ट्र देशाला दिशा देणारा राज्य असून महाराष्ट्रच देशाचे नेतृत्व करेल, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले तर गद्दारांना टकमक दाखवायचे आहे. आम्ही हुकुमशाही विरोधात एकत्र आलो असल्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
श्रीवर्धन येथे आरडीसीसी बँकेच्या नूतन शाखेच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी शरद पवार यांच्या हस्ते व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थित झाला. त्यानंतर कोकण उन्नती शाळेच्या पटांगणात सभा झाली. यावेळी अनंत गीते, जयंत पाटील, सुरेश लाड आदी मान्यवरही उपस्थित होते.
जिल्हा बँकेचा लैकिक आहे. राज्यात अनेक कारखाने सहकार क्षेत्रातील आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण सुधारले. बँक कशी चालवायची हे आमदार जयंत पाटील यांनी दाखवून दिले. बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी अनेक उपक्रम राबविले, याकडे पवार यांनी लक्ष वेधले. मतभेद विसरून एकत्र आलो आहोत, असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
गद्दारांचा टकमक टोकावरून कडेलोट करा- उद्धव ठाकरे
आम्ही हुकुमशाही विरोधात एकत्र आलो आहोत. ज्या पक्षातून निवडून यायचे त्यानंतर स्वतः वर संकट आले की सोडून जायचे अशा गद्दारांचा टकमक टोकावरून कडेलोट करायचा आहे. आरक्षणबाबत एकही शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले नाहीत. ७० हजार कोटींबाबत एक ‘शब्द’ मोदी बोलले नाहीत. शरद पवार यांनी कृषिमंत्री असताना ७० हजार कोटीची कर्जमाफी केली आहे. सुडाचे राजकारण सुरू आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
श्रीवर्धन हा अंतुलेंचाच बालेकिल्ला
श्रीवर्धन हा बॅरिस्टर ए. आर. अंतुलेचाच बालेकिल्ला आहे. मी राजकीय बोलणार नाही पण इंडियाची मीटिंग होईल तेव्हा बोलेल. बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी राज्यमंत्री होते तेव्हा मोठ्या प्रमाणात काम केले. आजही अंतुले यांनी केलेल्या कामाची आठवण काढली जाते. त्यामुळे श्रीवर्धन हे कोणाचे नाही, ते अंतुले यांचेच आहे. अंतुले यांनी राजकारण कधी आणले नाही. पहिली कर्जमाफी शरद पवार तर दुसरी कर्जमाफी बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी केली. पुन्हा अंतुलेचे वैभव उभे करायचे आहे, असे आवाहन शेवटी पाटील यांनी व्यक्त केले.