पाण्यासाठी रहिवाशांची एकजूट
By admin | Published: January 10, 2017 06:00 AM2017-01-10T06:00:41+5:302017-01-10T06:00:41+5:30
कर्जत तालुक्यातील भिवपुरी स्टेशनजवळ उभ्या राहिलेल्या समृद्धी कॉम्प्लेक्स गृहनिर्माण सहकारी संस्थेतील रहिवाशांची बिल्डरने फसवणूक केली असून
कर्जत : तालुक्यातील भिवपुरी स्टेशनजवळ उभ्या राहिलेल्या समृद्धी कॉम्प्लेक्स गृहनिर्माण सहकारी संस्थेतील रहिवाशांची बिल्डरने फसवणूक केली असून, त्याविरोधात रहिवासी एकटवले आहेत. आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ते शासन दरबारी खेटे घालत असून, प्रशासनातील काही अधिकाऱ्यांमुळे त्यांना न्याय मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये असंतोष पसरला आहे. त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी त्यांनी आपले आंदोलन उग्र करण्याचे ठरवले आहे. या बिल्डरने जलसंपदा खात्याकडून जवळील धरणातून पाणीउपसा करून या रहिवाशांना पाणीपुरवठा केला आहे; परंतु काही नियम व अटीवर घेतलेले पाणी हा बिल्डर या रहिवाशांना विकत असल्याचा आरोप येथील रहिवाशांंनी केला आहे.
बिल्डर आपली कशी फसवणूक करत आहे? याची माहिती देण्यासाठी समृद्धी कॉम्प्लेक्समध्ये रविवारी येथील रहिवाशांनी पत्रकार परिषद बोलावली होती. पोद्दार बिल्डर आणि डेव्हलपर्स यांनी भिवपुरी स्टेशनजवळ बाराशे सदनिकांची एक मोठे रहिवासी संकुल २०१० मध्ये उभे केले होते. तेव्हा या रहिवासी संकुलामध्ये अनेक मध्यमवर्गीय लोकांनी आपल्या स्वप्नातील घर कर्ज काढून घेतले होते. त्यावेळी पोद्दार बिल्डर यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सोसायटी आॅफिस, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला, भोगवटा प्रमाणपत्र, या सोई-सुविधा देणार, असे कबूल केले होते, त्या सुविधा या रहिवाशांना आजपर्यंत देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे येथे घर घेणाऱ्या मध्यमवर्गीय लोकांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे येथील रहिवाशांनी या बिल्डरविरु द्ध कर्जत पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.
बिल्डरने २०१० ते २०१६पर्यंत हा करार केला होता. या करारप्रमाणे प्रतिदहा हजार लिटर पाण्यासाठी त्यांना फक्त ८९ पैसे इतकेच मोजावे लागत होते. मात्र, रहिवाशांना अधिक पैशांना हे पाणी येथील हा बिल्डर विकत होता. त्यातून या बिल्डरने कोट्यवधी रु पये कमविले आणि रहिवाशांची फसवणूक केली असल्याचा आरोप या सोसायटीचे अध्यक्ष रामेश्वर कुटे आणि येथील रहिवाशांनी केला आहे. रहिवाशांनी या बिल्डरविरु द्ध कायदेशीर लढाई चालू केली असल्याने त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक पोलीस यांनी तक्र ार केल्यानंतर योग्य तपास न केल्याने रहिवाशांनी न्यायालयात जाऊन याची पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली होती. न्यायालयानेही त्यात तथ्य असल्याचे मानून पुन्हा चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यावरच हे रहिवाशी थांबले नसून, कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश भोसले यांनी योग्य चौकशी केली नाही म्हणून त्यांच्याविरु द्धसुद्धा तक्र ार केली आहे. (वार्ताहर)