विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षांबाबत लवकर निर्णय होणे आवश्यक- सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 01:01 AM2020-08-09T01:01:25+5:302020-08-09T06:47:54+5:30
गोरेगावमधील १६ महाविद्यालयांना राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने मदत
माणगाव : कोविड १९च्या काळात विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रखडल्याचे माझ्यासह सर्वच पालकांना आणि विद्यार्थ्यांना टेन्शन आहे. परीक्षा घ्याव्या, असे युसीजी म्हणते, तर परीक्षा घेण्यास राज्य सरकार तयार नाही. याबाबत न्यायालयात याचिका दाखल आहे. त्याचा १० ऑगस्टला निर्णय अपेक्षित आहे, पण आता हा निर्णय घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त करीत खासदार सुप्रिया सुळे यांनी प्राध्यापकांना त्यांची मते पाठविण्याचे आवाहन केले.
निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या १६ महाविद्यालयांना राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने १०० संगणक आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप शनिवारी गोरेगाव येथील दोशी वकील महाविद्यालयात करण्यात आले. त्यावेळी सुळे बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर खा.सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आ.अनिकेत तटकरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड, तालुकाध्यक्ष सुभाष केकाणे, विद्यापीठाचे जॉइंट डायरेक्टर संजय सावंत, सरपंच जुबेर अब्बासी आदी मान्यवर उपस्थित होते.
केंद्र सरकार नवीन शैक्षणिक धोरण आखत आहे, याबाबत शिक्षक व प्राध्यापक वर्गाच्या सूचना मला मिळाल्या, तर त्याबाबत आम्हाला आमचे मत मांडता येईल, असे सुळे यांनी सांगून तशा सूचना करण्याचे आवाहन शिक्षकांना केले.
खा. सुनील तटकरे यांनी गेल्या ८ ते १० वर्षांतील दहावी व बारावीचे निकाल पाहिले, तर त्यात कोकण नेहमी अव्वल असतो. चक्रीवादळानंतर शरद पवार यांनी कोकण दौरा केला त्यांनी परिस्थिती पाहिली आणि त्यानंतरच आतापर्यंतची सर्वाधिक नुकसान भरपाई देण्याची सूचना राज्य सरकारला केली. इतकेच नव्हे, तर पक्षाच्या माध्यमातून कोकणातील नुकसानग्रस्त महाविद्यालयांना पत्रे, संगणकांची मदत केल्याचे सांगितले.
अदिती तटकरे यांनी पक्षाच्या माध्यमातून महाविद्यालयांना केलेल्या मदतीची माहिती दिली.यावेळी सर्व लाभार्थी महाविद्यालयांना प्रातिनिधिक स्वरूपात मदतीची पत्रे देण्यात आली, तसेच गोरेगांव येथील दहावी व बारावीतील पहिल्या तीन गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
माणसे पाहिली की बरं वाटतं
कोरोनोच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या आॅनलाइन होणाऱ्या बैठकांबाबत विचारले असता, झूम कॉल्स बरेच झाले, व्हीसी झाली. आता कंटाळा आला. आता माणसं पहिली की बरं वाटतं. कारण माणुसकीचा वा नात्याचा ओलावा तो फोनमधून येत नाही, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.