शेखार्डी हद्दीत अज्ञात बोटींचे वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 01:43 AM2019-08-01T01:43:36+5:302019-08-01T01:43:40+5:30

पोलीस प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी : गावकऱ्यांमध्ये कुतूहल, भीतीचे वातावरण

Unknown boats lived in Shekhardi limits | शेखार्डी हद्दीत अज्ञात बोटींचे वास्तव्य

शेखार्डी हद्दीत अज्ञात बोटींचे वास्तव्य

Next

संतोष सापते 

श्रीवर्धन : देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सागरीकिनारा अतिशय संवेदनशील मानला जातो. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास शेखार्डी गावाच्या हद्दीत अचानक अज्ञात बोटींचा संचार झाला, त्यामुळे ही बाब गावकऱ्यांसाठी कुतूहल व भीतीची ठरली.

रविवारी पावसामुळे शेखार्डी गावातील विद्युतपुरवठा काही काळासाठी खंडित झाला, त्यामुळे गावातील आरिफ करबेळकर गावच्या मुख्य रस्त्यावर भ्रमणध्वनी वरून विद्युतपुरवठा पूर्ववत होण्यासंदर्भात चौकशी करण्यासाठी पोहोचले. त्या वेळी टेकडीवरून गावच्या हद्दीत अज्ञात बोटींचे दिवे चमकत असल्याचे दिसून आले. बोटी गावच्या हद्दीत आल्याचे अनेक ग्रामस्थांनी टेकडी वरून व किनाºयावरून बघितले त्यामुळे ग्रामस्थांच्या मनात कुतूहल व भीतीचे वातावरण निर्माण झाले. जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार १ आॅगस्टपर्यंत पाण्यात उतरण्यासाठी निर्बंध घातले असताना समुद्रातील वास्तव्य करत असलेल्या बोटी कुठल्या आहेत? असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थांच्या मनात निर्माण झाला आहे.
या बोटी रायगड जिल्ह्यातील नाहीत असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पोलीस प्रशासनाकडून कुठल्याही बोटींना परवानगी देण्यात आलेली नाही अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
शेखार्डी ते आदगाव गावाच्या जवळपास वास्तव्य केलेल्या बोटी कोणत्या हेतूने संचार करत होत्या हा मुख्य प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिकांच्या सांगण्यानुसार मध्यरात्री गावाच्या हद्दीच्या जवळ वास्तव्य करणाºया बोटी मच्छीमारसाठी आल्या असतील तर त्याचा विपरित परिणाम आमच्या व्यवसाय व रोजगारावर होऊ शकतो. त्यामुळे या बोटींची सत्यता समजणे अनिवार्य आहे. स्थानिक ग्रामस्थानी ‘लोकमत’शी बोलताना सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सकारात्मक व प्रभावी शासकीय धोरणांची गरज असल्याचे सांगितले.

रविवारी दुपारी नेव्हीची बोट शेखार्डीच्या किनाºयावर येऊन गेली. समुद्रकिनारी थांबलेल्या बोटींची संख्या मोठ्या प्रमाणात होती. आम्हाला मच्छीमारीची बंदी असताना समुद्रात आलेल्या बोटींविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होते. या बोटी मच्छीमारीसाठी आल्या असतील तर त्याचा विपरित परिणाम आमच्या व्यवसायावर होऊ शकतो.
- इनयात सोंडे, मच्छीमार व्यावसायिक, शेखार्डी

बोटींविषयी कुणीही माहिती दिली नाही; परंतु या बाबीची सत्यता तत्काळ तपासली जाईल, योग्य ती कारवाई केली जाईल.
- बाळकृष्ण जाधव,
पोलीस निरीक्षक, श्रीवर्धन

रविवारी रात्री शेखार्डी गावाच्या हद्दीत काही बोटी थांबल्याचे निदर्शनास आले. मी व माझ्यासोबत गावातील अनेक लोकांनी त्या बोटी बघितल्या जवळपास २० वाव पाण्यामध्ये त्या बोटी असाव्यात. दूरवरून त्या बोटी कुठल्या आहेत, हे मात्र समजू शकले नाही.
- आरिफ करबेलकर,
मच्छीमार व्यावसायिक, शेखार्डी

रायगड जिल्ह्यातील बोटींना सांकेतिक चिन्ह म्हणून लाल रंगाचा पट्टा असतो; परंतु रविवारी शेखार्डीच्या समुद्र परिसरात बोटी दूरवर असल्यामुळे काहीच समजू शकले नाही; परंतु त्यांचे वास्तव्य होते हे मात्र निश्चित.
- दानिश फणसबकर, ग्रामस्थ, शेखार्डी

आम्ही सदैव सागरीसुरक्षेच्या बाबतीत सजग आहोत, पोलीस खाते व नेव्ही यांना मदत करण्यात तत्पर आहोत. आम्हाला सागरीसुरक्षा संघटनेच्या सभासदत्वाचे कार्ड मिळाल्यास निश्चितच त्याचा आम्ही सागरीसुरक्षेसाठी वापर करू, आमच्या गावातील चार ते पाच लोकांना कार्ड मिळाले आहे त्यालासुद्धा अनेक वर्षे झाली आहेत.
- तोफिक शेखदरे, ग्रामस्थ, शेखार्डी

Web Title: Unknown boats lived in Shekhardi limits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड