जिल्ह्यातील असंघटित कामगारांची नोंद करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 11:48 PM2019-03-01T23:48:25+5:302019-03-01T23:48:28+5:30
जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा मिळणार लाभ
अलिबाग : जिल्ह्यातील ५० हजार असंघटित कामगारांची नोंद करून त्यांना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेत सहभागी करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवल्याचे रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. ५ मार्चपूर्वी जिल्ह्यातील २२ हजार असंघटित कामगारांची नोंद करण्याचे लक्ष्यही कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेतील पेन्शन योजनेचा लाभ वयाच्या ६० व्या वर्षापासून सुरू होऊन लाभार्थ्याच्या मृत्यूपर्यंत पेन्शन मिळणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी लाभार्थ्याची वयोमर्यादा १८ ते ४० वर्षे आहे. वयाच्या १८ व्या वर्षी योजनेत सहभागी झालेले लाभार्थी तब्बल ४२ वर्षांनंतर पेन्शन घेण्यास पात्र होणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची माहिती देण्यासाठी राजस्व सभागृहात शुक्र वारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. केंद्र सरकारने १५ फेब्रुवारीपासून असंघटित क्षेत्रात काम करणाºया कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रमजीवी मानधन पेन्शन योजना सुरू केली आहे. कोणतीही पेन्शन योजना लागू नसलेले कामगार या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. त्यांची ग्रामपंचायतस्तरावर नावनोंदणी करावी व गरजू कामगारांना या योजनेत सहभागी करून घ्यावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक हे या योजनेचे नोडल अधिकारी आहेत. तर या योजनेत कामगारांना सहभागी करून घेण्यासाठी ग्रामपंचायतस्तरावर ४ मार्च रोजी शिबिराचे आयोजन करून असंघटित कामगारांची नोंदणी करावी असे सांगितले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, प्रकल्प संचालक प्रकाश देवऋषी आदी उपस्थित होते.
हे कामगार घेऊ शकतात लाभ
या योजनेचा लाभ घरात काम करणारे कामगार, दुकानातील कामगार, ड्रायव्हर, प्लंबर, मिड डे मील वर्कर, रिक्षा चालवणारे, वीटभट्टीवर काम करणारे कामगार, कारखान्यातील कामगार, शेतमजूर असंघटित शेतातील कामगारांसोबत शासकीय यंत्रणेसोबत काम करणारे काही प्रवर्ग यात अंगणवाडी सेविकांचे मदतनीस, ग्रामपंचायतीमधील कंत्राटी कामगार, महिला बचतगटाच्या सदस्य असलेल्या महिला यादेखील लाभ घेऊ शकतात.
५०-५० टक्के हप्ता
योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे महिन्याचे उत्पन्न हे १५ हजार रु पयांपेक्षा कमी असावे, लाभार्थी जितका हप्ता भरणार आहे, तेवढाच हप्ता केंद्र सरकारही देणार आहे. उदाहरणार्थ एखाद्या लाभार्थ्याचे वय १८ आहे तर त्याला हप्ता असेल ५५ रु पये म्हणजेच केंद्र सरकारही ५५ रु पये भरणार आहे.लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ११० रु पये जमा होतील. वयाच्या ६० वर्षांनंतर त्याला तीन हजार रुपये एवढी पेन्शन सुरू होईल. लाभार्थ्याचा मृत्यू झाला तरीही त्याच्या कुटुंबीयांना ५० टक्के फॅमिली पेन्शन सुरू राहणार.