मध्य रेल्वेचा १७१ वर्षांचा अभूतपूर्व प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2024 05:55 PM2024-04-15T17:55:23+5:302024-04-15T17:56:42+5:30
भारतीय रेल्वेने १७१ गौरवशाली वर्षे पूर्ण केली.
मधुकर ठाकूर, उरण: भारतीय रेल्वेने १७१ गौरवशाली वर्षे पूर्ण केली. १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान धावणारी आशियातील आणि भारतातील पहिली ट्रेन बोरी बंदर (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) येथून रवाना झाली. जशी वर्षे उलटली, तशी पहिली ट्रेन चालवणारी ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे १९०० मध्ये इंडियन मिडलँड रेल्वे कंपनीत विलीन झाली आणि तिच्या सीमा उत्तरेला दिल्ली, उत्तर - पूर्वेकडे कानपूर व अलाहाबाद तसेच पूर्वेकडे नागपूर ते दक्षिण - पूर्वेकडील रायचूरपर्यंत विस्तारल्या.
५ नोव्हेंबर १९५१ रोजी निजाम संस्थान, सिंधिया संस्थान आणि ढोलपूर संस्थानातील रेल्वे यांचे एकत्रीकरण करून मध्य रेल्वेची स्थापना करण्यात आली. सध्या मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर आणि पुणे या ५ विभागांसह मध्य रेल्वे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यांमध्ये ४,२७५ मार्ग किमी पेक्षा जास्त अंतरावर पसरली असून या राज्यातील तब्बल ४६६ स्थानकांद्वारे मध्य रेल्वे सेवा देते.
एप्रिल १८५३ मधील पहिल्या ट्रेनपासून ते भारतातील सर्वात आधुनिक ट्रेन, वंदे भारत एक्स्प्रेसपर्यंत, रेल्वेने गेल्या १७१ वर्षांमध्ये आपले जाळे यशस्वीरित्या विस्तृत केले आहे. सध्या मध्य रेल्वे ६ वंदे भारत एक्सप्रेस गाड्या चालवते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगांव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-जालना, नागपूर-बिलासपूर आणि नागपूर-इंदूर वंदे भारत यांचा समावेश आहे.
अनेक मोठ्या कामगिरीसह मध्य रेल्वे आघाडीवर आहे. त्यापैकी काही उल्लेखनीय कामगिरी पुढीलप्रमाणे: पहिली शताब्दी एक्सप्रेस, पहिली जनशताब्दी एक्सप्रेस, पहिली तेजस एक्सप्रेस इत्यादी व पंजाब मेल सारख्या काही जुन्या गाड्या १०० वर्षांनंतरही धावत असल्याने आणि प्रवाशांमध्ये लोकप्रिय असल्याने यामार्फत मध्य रेल्वेने निश्चितच खूप मोठा पल्ला गाठलेला आहे.असे मध्यरेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
३ फेब्रुवारी १९२५ रोजी बॉम्बे व्हीटी आणि कुर्ला हार्बर दरम्यान भारतातील पहिली इलेक्ट्रिक ट्रेन सेवेच्या धावण्याने रेल्वे आणि मुंबईच्या उपनगरीय सेवांच्या विद्युतीकरणाची पायाभरणी केली गेली. ज्याने आज रेल्वे मुंबई शहराची जीवनरेखा बनली आहे. आज मध्य रेल्वेने १००% विद्युतीकरणाचे लक्ष गाठले आहे आणि याने उपनगरीय सेवेचा विस्तार सातत्याने वाढत आहे. सध्या मध्य रेल्वेकडे पाच उपनगरीय कॉरिडॉर आहेत. ३ डब्यांपासून सुरू झालेल्या उपनगरीय सेवा हळूहळू ९ डब्यांच्या, १२ डब्यांच्या आणि काही सेवांमध्ये १५ डब्यांपर्यंत वाढल्या आहेत. प्रवास अधिक सोयीस्कर आणि आरामदायी करण्यासाठी वातानुकूलित उपनगरीय सेवाही मध्य रेल्वेवर सुरू करण्यात आल्या आहेत.
निर्माणाच्या वेळी मूळ लोडिंग जे १६.५८ दशलक्ष टन होते ते आता २०२३-२४ मध्ये ८९.२४ दशलक्ष टन झाले आहे जे आजपर्यंतचे सर्वोत्तम लोडिंग आहे. याशिवाय, नवीन रेल्वे मार्ग बांधणे, दुहेरीकरण, पूल बांधणे, नवीन स्थानके बांधणे इत्यादी पायाभूत सुविधांची कामे वेगाने सुरू असून या आर्थिक वर्षात सर्वाधिक ३४८ किलोमीटरचे मल्टी ट्रॅकिंग काम पूर्ण करण्यात आले आहे.
नेरळ-माथेरान लहान रेल्वेनेही ११७ गौरवशाली वर्षे पूर्ण केली आहेत. नेरळ-माथेरान रेल्वेचे बांधकाम १९०४ मध्ये सुरू झाले आणि दोन फूट गेज लाइन अखेरीस १९०७ मध्ये वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. खबरदारी म्हणून, पावसाळ्यात ही लाईन बंद राहिली, तथापि, अमन लॉज ते माथेरान दरम्यानची शटल सेवा पावसाळ्यातही चालवण्यासाठी दि. २९.९.२०१२ पासून सुरू करण्यात आली. नेरळ-माथेरान नॅरोगेज मार्गावरील प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास तसेच सेवा सुनिश्चित करण्यासाठी मध्य रेल्वेने या विभागात अनेक पायाभूत सुविधांची कामे हाती घेतली आहेत.
१८५३ पासून आजपर्यंत, मध्य रेल्वे सर्वोत्तम सेवा प्रदान करण्यात नेहमीच अग्रेसर राहिली आहे व राहील, आणि आपल्या आदरणीय प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी तसचे सोयीस्कर प्रवास देण्यासाठी कटिबद्ध राहील अशी ग्वाहीही मध्यरेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून दिली आहे.