खोपोली : नगरपालिका हद्दीतील प्रभाग ७ मध्ये मुळगाव ते डी. पी. रोड दरम्यान एका हॉटेल व्यावसायिकाने अलीकडेच डांबरीकरण केलेल्या रस्त्यात मोठ्या प्रमाणात खोदकाम करून रस्त्याची दुर्दशा केली आहे. या खोदकामाबाबत पालिका प्रशासनाची परवानगीच घेतली नसल्याने या प्रभागातील नगरसेविका अलका शेंडे या आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी मुख्याधिकारी संजय शिंदे यांना निवेदन देऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.मुळगाव पुलाजवळ डी.पी.रोडवर नियोजित हॉटेलचे काम सुरू आहे. संबंधित मालकाने हॉटेलचे सांडपाणी नदीत सोडण्यासाठी छुप्या मार्गाने नव्यानेच डांबरीकरण केलेला रस्ता रातोरात जेसीबी यंत्राने उखडून त्यात पाइप टाकले. हे करत असताना त्याने पालिका प्रशासनाची परवानगी घेतली नसल्याचा नगरसेविका अलका शेंडे यांचा आरोप आहे. परवानगी नसल्यानेच हॉटेल मालकाने रात्रीचे काम केले आहे व त्यांनी कुठलीही परवानगी घेतली नाही याबाबत संबंधित अभियंत्यानाही परवानगी नसल्याचे आपणास सांगितले असे शेंडे यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे या खोदकामाजवळ महावितरणचा विद्युत जनित्र आहे त्यामुळे भविष्यात या ठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही असे शेंडे यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. शेंडे यांच्या आक्र मक पवित्र्यामुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.डी.पी.रोड खोदकामाबाबत नगरसेविका शेंडे यांचा फोन आला. मी स्वत: अभियंत्यांना घटनास्थळी जाऊन पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.- संजय शिंदे, मुख्याधिकारी, खोपोली
खोपोलीत विनापरवाना खोदला रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:37 PM