पनवेल: मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसाने मंगळवारी कहर केला. पहाटे पासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने पनवेल तालुक्यातील भाजीपाला पिकवणारे शेतकरी, वीटभट्टी व्यावसायिक आणि इतर लघु व्यावसायकांचे मोठे नुकसान केले. अक्षरशः पावसाळ्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाप्रमाणे पावसाचा जोर पहावयास मिळाला.
मंगळवारी ११ च्या सुमारास पावसाने उसंत घेतली. मात्र तो पर्यंत पनवेल मधील खारघर,कळंबोली,तळोजासह ग्रामीण भागात सर्वत्र चिखलच चिखल पहावयास मिळाले. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते. खारघर शहराच्या प्रवेशद्वार हिरानंदानी याठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. पालिकेच्या माध्यमातुन याठिकाणी साचलेले बाहेर काढण्यास शर्तीचे प्रयत्न सुरु होते. टोमॅटो,वांगी आदींसह भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असल्याने शासनाने त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी सज्जन पवार आणि चंद्रकांत भगत यांनी केली आहे.
मागील १५ वर्षांपासून वीटभट्टी व्यवसाय करणारे कैलाशबुवा पाटील यांनी देखील यावर्षी एवढे वीटभट्टी मालकांचे कधीच नुकसान झाले नसल्याचे सांगितले. तालुक्यातील नेवाळी याठिकाणी मुर्बी गावातील कैलाशबुवा पाटील यांचा वीटभट्टीचा व्यवसाय आहे. कच्चा माल थापून पूर्ण झाला असताना हा माल शेवटच्या प्रक्रियेसाठी भट्टीत जाण्यापूर्वी अवकाळी पावसामुळे मातीमोल झाला आहे. तालुक्यातील कैलासबुवा पाटीलच नव्हे तर शेकडो वीटभट्टी व्यावसायिकांची ही अवस्था आहे. प्लास्टिक कागदाच्या आवरणाखाली काहींनी हा कच्चा माल झाकण्याचा प्रयत्न केला. मात्र पावसाचा जोरच एवढा होता कि या मालाच्या सभोवताली पूर्ण पाणी साचल्याने वीटभट्टी व्यावसायिकांची मेहनत वाया गेली आहे. हा नुकसान कित्येक कोटींच्या घरात असल्याचे दुसरे वीटभट्टी मालक राजेश फुलोरे यांनी सांगितले.
वातावरणाच्या बदलामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता सध्याच्या घडीला वातावरणातील बदलामुळे थंडी, गर्मी आणि पाऊस अशाप्रकारचे मिश्रित वातावरण सर्वानाच पहावयास मिळत आहेत.आरोग्याच्या दृष्टीने हे घातक असून नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे अवाहन पनवेल महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद गोसावी यांनी केले आहे.