उरण परिसरातील आंबा बागायतदारांना अवेळी पावसाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2023 09:40 PM2023-03-07T21:40:17+5:302023-03-07T21:41:40+5:30
उरण परिसरात मंगळवारी (७) अवेळी पाऊस पडला.यामुळे मोहरानी बहरलेले व काही ठिकाणी कैऱ्या धरलेले आंबापिक पूर्णता धोक्यात आले आहे.
- मधुकर ठाकूर
उरण : उरण परिसरात मागील दोन-तीन दिवसापासून ढगाळ वातावरण आणि मंगळवारी (७) बरसलेल्या अवेळी पावसामुळे आंबा पिकाला चांगलाच फटका बसला आहे. यामुळे आंबा बागायतदार आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.उरण परिसरात मंगळवारी (७) अवेळी पाऊस पडला.यामुळे मोहरानी बहरलेले व काही ठिकाणी कैऱ्या धरलेले आंबापिक पूर्णता धोक्यात आले आहे. अवेळी पडलेल्या पावसामुळे आंबा बागेत कैऱ्यां गळून खच पडला आहे. मोहराला या पावसामुळे आता बुरशी धरू लागली आहे. मोहोर पूर्णता काळवंडला आहे. त्यामुळे आंबा बागातदार शेतकरी चिंतेत पडले आहेत.
यावर्षी आंब्यांना चांगला मोहर आला होता. मात्र ढगाळ वातावरण आणि अवेळी पाऊस यामुळे आंबा बागायतदारांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, या पावसाचा परिणाम आंबा पिकावर झाला आहे. या वातावरणामुळे आंबा मोहोरावर तुडतुडा, लाल कोळी, भुरी रोग, मोहोर काळा पडणे, यातून चिकटी व मधुरा पडण्याच्या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. कोकणातील रत्नागिरी आणि देवगड हापूसची जात जगप्रसिद्ध आहे.
उरण परिसरात या जातीच्या आंब्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आंबा पिकांवर अवेळी पाऊस, तापमानात वाढ आणि कमीपणा आदीबाबत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान टाळण्यासाठी आंबा पीक योजना लागू करण्यात यावी अशी मागणी येथील आंबा बागायतदारांकडून केली जात आहे. आंब्याप्रमाणेच भाजीपाला फळांवर देखील या ढगाळ वातावरणाचा परिणाम झाला आहे. त्यामुळे भाजी पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
या वर्षी आंबा पिक चांगले येईल अशी परिसरातील सर्वच बागायतदार शेतकऱ्यांची अपेक्षा होती. परंतु नैसर्गिक बदलामुळे आता अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बागायतदारांना बदलत्या हवामानाचा व अवेळी पावसाचा चांगलाच बसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असल्याची माहितीकृषी मित्र शेतकरी प्रफुल्ल खारपाटील, आंबा बागायतदार संतोष चिर्लेकर यांनी दिली.