अलिबाग :रायगड जिल्हयाच्या अनेक भागाला गुरुवारी संध्याकाळी अवकाळी पावसाचा तडाखा बसला. दुपारी महाडमध्ये गारांचा पाऊस झाला असतानाच संध्याकाळी जिल्हयाच्या विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसाने शेतकऱ्याबरोबरच वीटभट्टी मालकांना मोठया नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.
रोहा, कोलाड, माणगाव, सुधागड भागात अवकाळी पावसाने संध्याकाळी हजेरी लावली. खालापूर, खोपोली, पेण आणि कर्जत परीसरातही जोरदार वारयासह पावसाला सुरूवात झाली आहे. आजच्या पावसाने आंबापीकाबरोबरच कडधान्य पीकाला मोठा फटका बसणार आहे. कडधान्य पिकांच्या काढणीचा हंगाम सध्या अंतिम टप्प्यात आहे. उरलेसुरले पीक घरात घेवून येण्यासाठी शेतकरयांची लगबग सुरू असतानाच आज पावसाने दाणदाण उडवली. मोहोर उशिरा आल्याने आंब्याच्या कैरया आता लगडत आहेत मात्र पावसाने कैरयांची मोठया प्रमाणावर गळती झाली आहे. दुसरीकडे वीट भटटी मालकांना मोठया नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. संध्याकाळच्या पावसाने महामार्गावरील वाहतूक मंदावली आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्हयातील वातावरण सातत्याने बदलते आहे. कधी ढगाळ वातावरण तर कधी कडक ऊन अशी स्थिती असते. कालपासून जिल्हयाच्या सर्वच भागात दाट ढग जमा झाले होते. मात्र हवामान खात्याने कोकणात पावसाची शक्यता वर्तवली नव्हती . तरीदेखील जिल्हयाच्या अनेक भागात अवकाळी पाऊस बरसला आहे.