नागोठणे : आजपर्यंत एकही आंदोलन अयशस्वी झाले नाही. मी सांगतो त्या मार्गाने चला, यश निश्चितच आपले आहे. समोरील शत्रू फार प्रबळ असल्याने यापुढे गनिमी काव्याने काम करणार आहे. स्वत:चा कोणताही स्वार्थ नसल्याने कोणालाही घाबरत नसून शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या कल्याणासाठी झटणार असल्याची स्पष्टोक्ती मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तथा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. जी. कोळसे-पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांना दिली.
लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या नागोठणे शाखेच्या वतीने नागोठणे ते चोळे मार्गातील भूमिहीन प्रकल्पग्रस्त, नलिकाग्रस्त शेतकरी, कायम आणि कंत्राटी कामगार, सुशिक्षित बेरोजगार युवक तसेच निवृत्त कामगारांची सभा शुक्रवारी सायंकाळी उशिरा रिलायन्स कंपनी लगतचे कुहिरे परिसरात पार पडली. त्या वेळी अध्यक्षीय भाषणात कोळसे-पाटील बोलत होते. सरकारला कर रूपाने किंवा इतर मार्गाने पैसे देणाऱ्यांमध्ये ९० टक्के गरीब व उर्वरित १० टक्के च भांडवलदार शासनाला कर देत असतात. सगळे एकत्र आलेत तर मूठभर दडपशाही करणारे निश्चितच मागे पडतील. तुमच्या प्रश्नांबाबत या कंपनीला निर्णय घेण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली असून, संविधानाच्या मार्गाने लढा करण्यात येईल, असा इशारा कोळसे-पाटील यांनी दिला.या सभेला संघटनेचे राष्ट्रीय सल्लागार अॅड. संतोष म्हस्के, मुख्य संघटक राजेंद्र गायकवाड आदींसह शेकडो प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.न्यायाची लढाई सुरू-म्हस्केप्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी अहिंसेच्या मार्गाने लोकशाही तसेच न्यायाची ही लढाई सुरू झाली असल्याचे अॅड. संतोष म्हस्के यांनी सांगितले. रिलायन्स कंपनीने स्थानिक अध्यक्ष शशांक हिरे यांना निलंबित केले असल्याने म्हस्के यांनी हिरेंचा दाखला देत व्यवस्थापनाने माणसांच्या जीवाशी खेळ करायला सुरुवात केली असल्याचा आरोप केला.